मालगावात सुरेश खाडे यांना भाजपचाच प्रतिबंध

By Admin | Published: July 16, 2015 12:15 AM2015-07-16T00:15:05+5:302015-07-16T00:15:05+5:30

ग्रामपंचायत निवडणूक : एकाच गटाबरोबर बैठक घेतल्याने नाराजी, मतदान होईपर्यंत तटस्थ राहण्याचा सल्ला

BJP's ban on Suresh Khade in Malgaon | मालगावात सुरेश खाडे यांना भाजपचाच प्रतिबंध

मालगावात सुरेश खाडे यांना भाजपचाच प्रतिबंध

googlenewsNext

मिरज : मालगाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारात सहभागी झाल्याबद्दल आ. सुरेश खाडे यांना भाजप समर्थकांनीच जाब विचारला. मालगावात ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या दोन्ही गटात भाजपसमर्थक असल्याने आ. खाडे यांनी तटस्थ राहून निवडणूक होईपर्यंत प्रचारात सहभाग घ्यायचा नाही, असा निर्णय झाला. कार्यकर्त्यांच्या दबावामुळे आ. खाडे यांनी मालगाव ग्रामपंचायत निवडणुकीत तटस्थ राहणार असल्याचे सांगितले.मालगाव ग्रामपंचायत निवडणुकीत सुरेश खोलकुंबे विरुध्द जिल्हा परिषद सदस्य आप्पासाहेब हुळ्ळे, सदानंद कबाडगे, काकासाहेब धामणे यांच्यात चुरशीची निवडणूक होत आहे. आ. खाडे व भाजपसमर्थक कार्यकर्ते दोन्ही गटात विभागले आहेत. खोलकुंबे गटाला माजी मंत्री अजितराव घोरपडे व खा. संजय पाटील यांचाही पाठिंबा असल्याने आ. सुरेश खाडे यांनी सोमवारी रात्री सुरेश खोलकुंबे गटाच्या प्रचारासाठी मालगावात रामनगर व माळी वस्ती येथे प्रचार बैठक घेतली. याचे वृत्त समजताच हुळ्ळे गटातील आ. खाडे समर्थक दिलीप चौगुले, कुबेर कुंभार, अरुण धामणे, लाला शेडबाळे, योगेश अमणगे, गंगाधर यलपार्टे, नेहरू चिप्परगे यांच्यासह शंभरावर आ. खाडे समर्थकांनी मिरजेत आ. खाडे यांचे कार्यालय गाठले. यावेळी आमदार अन्यत्र बैठकीत असल्याने कार्यालयात अनुपस्थित होते. मात्र मालगाव निवडणूक प्रचाराबाबत जाब विचारण्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आल्याची माहिती मिळताच आ. खाडे कार्यालयात आले. विधानसभा निवडणुकीत दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी तुम्हाला मताधिक्य मिळवून दिले असल्याने, एका गटाच्या प्रचारातील सहभागास कार्यकर्त्यांनी जोरदार आक्षेप घेतला. आ. सुरेश खाडे यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढत मालगाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारात सहभागी न होण्याचे व मतदान होईपर्यंत तटस्थ राहण्याचे आश्वासन दिले. एवढ्यावरच न थांबता कार्यकर्त्यांनी दि. २५ पर्यंत मालगावात फिरकू नये, असा आग्रह धरला. अखेर प्रचारात सहभागी न होता तटस्थ राहण्याच्या तोडग्यानंतर ग्रामपंचायत प्रचाराच्या वादावर पडदा टाकण्यात आला. याबाबत खाडे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, मालगावात मला विधानसभा निवडणुकीत साडेसहा हजाराचे मताधिक्य देणारे दोन्ही गटातील कार्यकर्ते माझेच आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीत कोणीही निवडून आले तरी, ग्रामपंचायत भाजपचीच असेल. (वार्ताहर)

सर्वच नेत्यांची झाली गोची...
मालगाव ग्रामपंचायत निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपच्या कार्यकर्त्यांची दोन गटात विभागणी झाली आहे. चार महिन्यांपूर्वी सरपंच निवडणुकीतही सदस्य फुटल्यावरून बैठकीत जोरदार हाणामारी झाली होती. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जोरदार चुरस असल्याने, सर्वच पक्षांच्या नेत्यांची प्रचारात सहभागाबद्दल अडचण झाली आहे.

Web Title: BJP's ban on Suresh Khade in Malgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.