पालिकेला निधी देण्यात भाजपचा पक्षपात

By admin | Published: June 27, 2016 11:30 PM2016-06-27T23:30:48+5:302016-06-28T00:46:51+5:30

विश्वजित कदम : राज्य शासनावर टीकास्त्र; काँग्रेसची सत्ता असल्यामुळेच राजकारण केले जाते

BJP's bias in funding to the corporation | पालिकेला निधी देण्यात भाजपचा पक्षपात

पालिकेला निधी देण्यात भाजपचा पक्षपात

Next

सांगली : राज्यात काँग्रेसची सत्ता असलेल्या महापालिकांसह काँग्रेस आमदार, खासदारांना निधी देण्यात भाजप सरकारकडून जाणीवपूर्वक पक्षपात केला जात आहे. त्याचा त्रास जनतेला सोसावा लागत असल्याची टीका युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांनी सोमवारी सांगलीत केली. काँग्रेस नगरसेवकांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
कदम म्हणाले की, केंद्र व राज्यात काँग्रेसची सत्ता असताना निधीबाबत कधीही दुजाभाव झाला नाही. महापालिका, जिल्हा परिषदेत सत्ता कुणाचीही असो, काँग्रेसने निधी दिला होता. नेहमीच जनतेचे हित लक्षात घेऊन काँग्रेसने राजकारण केले. पण भाजप सरकारच्या काळात मात्र निधीबाबत पक्षपात केला जात आहे. काँग्रेसची सत्ता असलेल्या जिल्हा परिषद, महापालिकांना निधी डावलला जात आहे. त्याची शिक्षा मात्र जनतेला भोगावी लागत आहे. सांगली महापालिकेची निवडणूक तर विधानसभा, लोकसभेपूर्वी झाली होती. पण आज सांगलीची जनता त्याची किंमत मोजत आहे. येथील जनतेने मोठ्या विश्वासाने काँग्रेसच्या हाती सत्ता दिली आहे. या शहराचा विकास व्हावा, यासाठी भाजप सरकारनेही आपल्या धोरणात बदल करावा, असेही ते म्हणाले.
महापालिकेच्या वारणा पाणी योजना, रखडलेली ड्रेनेज योजना, जलशुद्धीकरण केंद्र व घरकुलांचे वाटप या प्रमुख विषयांवर त्यांनी नगरसेवकांशी चर्चा केली. ५६ व ७० एमएलडी जलशुद्धीकरण केंद्रासाठी ३० कोटीच्या निधीची गरज आहे. वित्त आयोगाच्या निधीतून या योजनेला निधी दिला जात आहे. ड्रेनेजच्या कामातही तांत्रिक अडचणी आहेत. महापालिकेने दीड हजार घरकुलांचे काम पूर्ण केले आहे. येत्या महिन्याभरात या घरकुलांचे वाटप होऊ शकते. त्यादृष्टीने वेगाने काम करण्याची सूचना केली आहे. पालिकेच्या विविध योजनांतील तांत्रिक व कायदेशीर अडचणींबाबत आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्याशीही चर्चा केली आहे. थकीत कर वसुलीसाठी काँग्रेस नेहमीच प्रशासनाच्या पाठीशी राहील, अशी ग्वाही त्यांना दिल्याचे कदम म्हणाले.
पालिकेच्या अडीच वर्षातील कारभाराबद्दल समाधान व्यक्त करून कदम म्हणाले की, अडीच वर्षापूर्वी सांगलीकरांनी काँग्रेसच्या हाती पालिकेची सूत्रे दिली. तेव्हा एलबीटीचा प्रश्न चिघळला होता. पालिकेचे उत्पन्न घटले होते. अशा स्थितीतही काँग्रेसने जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी पावले उचलली. ज्या परिस्थितीत काँग्रेसने काम केले, ते पाहता, समाधानी आहोत. महापालिकेचे नेतृत्व मदनभाऊ पाटील यांच्याकडे होते. त्यांच्या पश्चात जिल्ह्यातील नेत्यांनी महापालिकेची सूत्रे जयश्रीताई पाटील यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय घेतला. (प्रतिनिधी)

प्रलंबित प्रश्न : मुख्यमंत्र्यांना भेटणार
पालिका निवडणुकीत जनतेला दिलेल्या आश्वासनांचे उत्तरदायित्व आमच्यावर आहे. जनतेच्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाहीही दिली. यापुढे महापालिकेच्या कारभारात लक्ष घालणार असून, पुढील आठवड्यात पुन्हा आयुक्तांसोबत बैठक आयोजित केली आहे. पालिकेच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत प्रलंबित योजना व प्रस्तावित योजनांच्या निधीबाबत चर्चा होईल, असेही कदम यांनी स्पष्ट केले.


‘वालचंद’मध्ये चुकीचे घडले
वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ताब्यावरून भाजपमध्येच जुंपली आहे. त्याबाबत कदम यांना विचारता ते म्हणाले की, वालचंद महाविद्यालय देशातील प्रतिष्ठित अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. तिथे जे घडले, ते चुकीचे आहे. शिक्षण संस्थेत पावित्र्य राखले गेले पाहिजे.

Web Title: BJP's bias in funding to the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.