सांगलीत ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ला भाजपचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 11:55 PM2018-07-22T23:55:01+5:302018-07-22T23:55:07+5:30
श्रीनिवास नागे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महापालिका निवडणुकीत भाजपची घोडदौड रोखण्यासाठी काँग्रेस-राष्टÑवादीची आघाडी झाली आहे. शिवसेना, स्वाभिमानी विकास आघाडी आणि शहर सुधार समितीही मैदानात असली तरी सर्वच पक्षांत बंडखोरी झाली आहे. तब्बल ३५ अपक्षांनी एकत्र येत आघाडीची मोट बांधली आहे. त्यामुळे काँग्रेसपुढे सत्ता राखण्याचे, तर भाजपपुढे चांगली कामगिरी करण्याचे आव्हान आहे.
एक आॅगस्टला मतदान व ३ आॅगस्टला मतमोजणी होणार आहे. २० प्रभागांतील ७८ जागांसाठी ४५१ उमेदवार रिंगणात आहेत. महापालिकेत महाआघाडीची पाच वर्षे वगळता १५ वर्षे काँग्रेसचे दिवंगत नेते मदन पाटील यांच्या गटाकडे सत्ता आहे. मदन पाटील आणि माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या आकस्मिक निधनामुळे आता काँग्रेस सामूहिक नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवत आहे. आमदार विश्वजित कदम, मदन पाटील यांच्या पत्नी जयश्रीताई, वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांच्याकडे निर्णयाचे अधिकार असून, त्यांनी राष्टÑवादीच्या हाकेला प्रतिसाद देत आघाडी केली आहे.काँग्रेसला ४० तर राष्टÑवादी २९ जागा लढवत आहे. पाच जागांवर या दोन पक्षातच मैत्रीपूर्ण लढत आहे. राष्टÑवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आ. जयंत पाटील यांची जिल्ह्यातील ही पहिलीच निवडणूक आहे.
माजी आमदार संभाजी पवार गटाने शिवसेनेशी सवतासुभा घेत स्वाभिमानी आघाडीचे उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. महापलिकेतील भ्रष्टाचारावर आवाज उठवणाऱ्या शहर सुधार समितीचे शिलेदारही लढत देत आहेत. सत्तेच्या या सारीपाटावर उत्कंठा वाढवत ३५ अपक्षांनी आघाडी केली आहे.
यंदा १८ प्रभागांमध्ये प्रत्येकी चार, तर दोन प्रभागांमध्ये प्रत्येकी तीन जागा आहेत. विस्ताराने मोठ्या असलेल्या प्रभागात ऐन पावसाळ्यात संपर्क साधताना उमेदवारांची दमछाक होत आहे. सर्वच पक्षांचे प्रमुख नेते, मंत्री, आमदार पावसाळी अधिवेशनात गुंतले होते. त्यामुळे प्रचाराची खरी रणधुमाळी शेवटच्या आठवड्यातच दिसणार आहे.
सत्तेसाठ भाजपची मोठी फौज कामाला
एक खासदार, चार आमदारांच्या जोरावर भाजपने जिल्हा परिषद जिंकल्यानंतर आता महापालिकेची सत्ता खेचण्यासाठी मोठी फौज कामाला लावली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे
नेतृत्व असून खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे त्यांच्या साथीला आहेत. भाजप सर्व ७८ जागा लढवत आहे.