जिल्हा परिषदेतील भाजपचे नाराज अविश्वास ठराव आणण्याच्या तयारीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:33 AM2021-02-25T04:33:40+5:302021-02-25T04:33:40+5:30
पालकमंत्री जयंत पाटील यांनी काँग्रेस नेत्यांच्या मदतीने महापालिकेत भाजपला सत्तेवरून दूर केले. या पराभवाचा भाजपच्या नेत्यांनी धसका घेतला आहे. ...
पालकमंत्री जयंत पाटील यांनी काँग्रेस नेत्यांच्या मदतीने महापालिकेत भाजपला सत्तेवरून दूर केले. या पराभवाचा भाजपच्या नेत्यांनी धसका घेतला आहे. जिल्हा परिषद पदाधिकारी बदलासाठी सदस्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी दि. २५ फेब्रुवारी रोजी सांगलीत बैठक बोलाविली होती. प्रत्येक सदस्यांशी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील संवाद साधणार होते. परंतु, बुधवारी रात्रीपर्यंत जिल्हा परिषदेच्या सदस्यांना बैठकीचा निरोप मिळालेला नव्हता. मात्र भाजपच्या काही नेत्यांनी दि. २५ रोजीची बैठक रद्द झाल्याचे सांगितले. बैठक रद्द केल्यामुळे पदाधिकारी बदलासाठीच्या इच्छुकांनी नाराजी व्यक्त केली. येत्या चार दिवसात नेत्यांनी पदाधिकारी बदलाची भूमिका स्पष्ट केली नाही तर उघड भूमिका घेऊ. ती भूमिका काय असेल याबाबत सदस्यांनी काहीही स्पष्ट केले नाही. परंतु, काही सदस्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सहकार्याने अविश्वास ठराव आणण्याची तयारी केल्याची चर्चा आहे. प्रत्यक्षात तसे घडले तर महापालिकेनंतर जिल्हा परिषदेतही भाजपला धक्का बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
चौकट
पदाधिकारी बदलाचे धाडस भाजप दाखविणार का?
दहा दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत खासदार संजयकाका पाटील व आमदार सुरेश खाडे बदलाबाबत आग्रही राहिले होते. सर्व इच्छुक व पदाधिकारी बदलाची मागणी असणाऱ्या सदस्यांशी प्रदेशाध्यांनी बंद खोलीत चर्चा केली होती. बदलासाठी भाजप नेत्यांसह सदस्य आग्रही असल्यामुळे वरिष्ठ नेते पदाधिकारी बदल करणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
चौकट
शिवसेना भाजपबरोबरच राहणार असल्याचा दावा
आटपाडी तालुक्यातील सदस्यांनी शिवसेनेचे तीन सदस्य भाजपबरोबरच राहणार आहेत. तसा शब्द आमदार अनिल बाबर यांनी दिला आहे. त्या तिघांची भीती घालू नका, त्यांची जबाबदारी घेतो; पण पदाधिकारी बदल करा. अन्यथा भाजपमध्ये मोठा उद्रेक होईल, असा इशारा भाजपच्या सर्वच नाराज सदस्यांनी बुधवारी दिला.