भाजपच्या कारभारावर प्रदेश समितीकडून नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 05:22 PM2020-01-11T17:22:14+5:302020-01-11T17:24:50+5:30
महापालिकेत प्रथमच सत्तेत आलेल्या भाजपच्या कारभाराबाबत प्रदेश समितीकडून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. सध्याच्या कारभाराबद्दल नेते व नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्षांसह कार्यकारिणीतील नेत्यांकडे तक्रारी केल्या आहेत. त्यात कोअर कमिटीच्या स्वहित कारभाराचा पंचनामा होऊ लागला आहे. त्यावरून प्रदेश पातळीवरील नेत्यांनीही पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी केल्याची चर्चा भाजप वर्तुळात सुरू आहे
शीतल पाटील
सांगली : महापालिकेत प्रथमच सत्तेत आलेल्या भाजपच्या कारभाराबाबत प्रदेश समितीकडून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. सध्याच्या कारभाराबद्दल नेते व नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्षांसह कार्यकारिणीतील नेत्यांकडे तक्रारी केल्या आहेत. त्यात कोअर कमिटीच्या स्वहित कारभाराचा पंचनामा होऊ लागला आहे. त्यावरून प्रदेश पातळीवरील नेत्यांनीही पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी केल्याची चर्चा भाजप वर्तुळात सुरू आहे.
महापालिकेच्या स्थापनेनंतर २० वर्षांनी भाजपला सत्तेची चव चाखता आली. महापालिका निवडणुकीत सांगलीच्या जनतेनेही भाजपवर विश्वास दाखवित बहुमत दिले. पण गेल्या दीड वर्षात भाजपला फारसा समाधानकारक कारभार करता आलेला नाही. त्यात अनेक मुद्द्यांवरून वादही निर्माण झाले. त्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील भाजपचा आलेख खालावला.
महापालिका क्षेत्रातील सांगली व मिरज हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ भाजपने राखले असले तरी, पक्षाला मिळालेले मताधिक्य चिंतेचा विषय ठरले होते. सांगलीत केवळ सात हजार, तर मिरजेत ३० हजाराचे मताधिक्य मिळाले. दोन्ही मतदारसंघात तुल्यबळ उमेदवार नसताना काँग्रेसने दिलेल्या लढतीमुळे भाजप नेत्यांवर आत्मचिंतनाची वेळ आली आहे. या साºया गोष्टीला आता महापालिकेचा कारभारच जबाबदार असल्याचे बोलले जात आहे.
गेल्या दीड वर्षात कोट्यवधीची कामे झाली. त्याचे चांगले मार्केटिंगही भाजपने केले. तरीही मताधिक्य कमी का? असा प्रश्न भाजप प्रदेश समितीलाही पडला आहे. त्यातून काही नगरसेवकांसह भाजप नेत्यांनी महापालिकेच्या कारभाराबद्दल थेट प्रदेश समितीकडेच तक्रारी केल्या आहेत.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही काहींनी प्रत्यक्ष भेटून, महापालिकेविरोधात तक्रार केली. राज्यातील सत्ता गमाविल्यानंतर सावध झालेल्या भाजपने काही दिवसांपूर्वी राज्यातील सर्व महापालिकांच्या सभागृह नेत्यांची बैठक मुंबईत बोलाविली होती. या बैठकीतही इतर महापालिकेतील कारभारापेक्षा, सांगली महापालिकेच्या कारभाराचीच चर्चा झाल्याचे समजते. त्यातून काही पदाधिकाऱ्यांची प्रदेश समितीच्या नेत्यांनी कानउघाडणी केली आहे.
महापालिकेचा कारभार हाकण्यासाठी भाजपने कोअर कमिटी स्थापन केली आहे. या कमिटीला पदाधिकारी निवडीपासून ते संपूर्ण कारभार पाहण्याचे सर्वाधिकार देण्यात आले आहेत. पण कोअर कमिटीतील बहुतांश नेतेमंडळी आपल्या स्वकीयांनाच पदे देण्यात आघाडीवर आहेत.
जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कोअर कमिटीतील नेते कधीच आक्रमक झाल्याचे दिसून आलेले नाहीत. स्वहिताला प्राधान्य देण्याऱ्या कोअर कमिटीच्या कारभाराबद्दलही प्रदेश समितीकडून नाराजीचा सूर उमटू लागला आहे.