शिराळ््यात भाजपचा धुरळा
By admin | Published: February 23, 2017 10:55 PM2017-02-23T22:55:46+5:302017-02-23T22:55:46+5:30
राष्ट्रवादी-काँग्रेसचे वर्चस्व : लक्षवेधी लढतीने रंगत
विकास शहा --- शिराळा तालुक्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने भाजपच्या कमळाला फुलू न देता आपली पंचायत समितीवरील सत्ता ७-१ ने अबाधित ठेवली. या निवडणुकीत आमदार शिवाजीराव नाईक यांचे पुत्र सत्यजित नाईक हे पराभूत झाले असून, वाकुर्डे बुद्रुक हा हक्काचा मतदार संघही भाजपने गमावला आहे. पंचायत समिती सभापती पदाची माळ मायावती कांबळे यांच्या गळ्यात पडली आहे. वाकुर्डे बुद्रुक पंचायत समितीसाठी आमदार नाईक यांचे पुत्र सत्यजित यांच्या विरुध्द माजी आमदार मानसिंगराव नाईक यांचे पुतणे विद्यमान सभापती सम्राटसिंग नाईक यांच्यात लढत होती. हा मतदार संघ आमदार नाईक यांचा बालेकिल्ला होता. या लढतीत सम्राटसिंग यांनी विजय मिळविला, तर मांगले जिल्हा परिषदेसाठी मानसिंगराव नाईक यांच्या भावजय अश्विनी नाईक विरुध्द जि. प. चे माजी सभापती उदयसिंगराव नाईक यांच्या स्नुषा अनन्या नाईक यांची लढत होती. काही दिवसांपूर्वी मानसिंगराव यांच्या गटातून उदयसिंगराव नाईक हे बाहेर पडून भाजपमध्ये गेले होते. त्यामुळे ही लढत प्रतिष्ठेची झाली होती. मात्र या ठिकाणीही मानसिंगराव नाईक यांनी बाजी मारली. वाकुर्डे बुद्रुक जिल्हा परिषद हा आमदार नाईक यांचा बालेकिल्ला तसेच गतवेळी रणधीर नाईक हे याठिकाणी विजयी झाले होते. मात्र यावेळी आशा झिमूर यांनी सुरेखा कांबळे यांचा ६८५ मतांनी पराभव केला. याठिकाणी शिवसेनेचे उमेदवार सुनंदा झिमूर यांनी ४९० मते मिळविली. याठिकाणी पाचुंब्री हा पंचायत समिती गट भाजपने राखला. गतवेळी ही एकमेव जागा आमदार नाईक यांच्याकडे होती. यावेळी येथे सारिका पाटील यांनी १२६ मतांनी काँग्रेसच्या पौर्णिमा मोरे यांचा पराभव केला. कोकरुड जि. प. मध्ये माजी सभापती आमदार शिवाजीराव देशमुख यांचे पुत्र सत्यजितराव देशमुख यांनी ७४0३ मतांनी अमर माने यांचा पराभव केला, तर कोकरुड पंचायत समिती गणात अमरसिंह पाटील यांनी भाजपचे विकासराव देशमुख यांचा पराभव केला. कणदूर गणामध्ये राष्ट्रवादीच्या मनीषा गुरव यांनी भाजपच्या विमल लोहार यांचा पराभव केला.
आमदारपुत्रांची कहाणी चर्चेत
माजी सभापती आमदार शिवाजीराव देशमुख यांचे सुपुत्र ‘सत्यजित’ यांचा विजय झाला, तर आमदार शिवाजीराव नाईक यांचे पुत्र ‘सत्यजित’ यांचा पराभव झाला. या मतदार संघात एक आमदाराचा मुलगा निवडून आला, तर दुसऱ्या आमदाराचा पडला, अशीच चर्चा सुरू होती.