राष्ट्रवादीच्या संस्थेत भाजपची ‘एन्ट्री’
By admin | Published: November 5, 2015 10:54 PM2015-11-05T22:54:05+5:302015-11-05T23:56:36+5:30
इस्लामपूर बाजार समिती : विजय कुंभार, शिवाजीराव मोरे यांची संचालकपदी नियुक्ती
अशोक पाटील---इस्लामपूर राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील आणि विलासराव शिंदे यांचे नेतृत्व असलेल्या इस्लामपूर बाजार समितीवर पालिकेतील भाजपचे विरोधी पक्षनेते विजय कुंभार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिवाजीराव मोरे यांची शासनाने स्वीकृत संचालकपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या बाजार समितीत विरोधकांची ‘एन्ट्री’ झाल्याने, विरोधी बाकावर बसण्यासाठी दोन संचालक सक्रिय होणार आहेत.
इस्लामपूर पालिकेतील विरोधी पक्षनेते विजय कुंभार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांचे समर्थक शिवाजीराव मोरे यांची कृषी उत्पन्न बाजार समितीवर स्वीकृत संचालकपदी निवड झाल्यानंतर कॉँग्रेस पक्षात अस्वस्थता निर्माण झाली आहे. कॉँग्रेसचे विजय पवार यांनी बाजार समितीची निवडणूक लढवली होती. त्यांना राष्ट्रवादीच्या विरोधातील सर्वच पक्षांचा पाठिंबा होता. मात्र ते अल्पमताने पराभूत झाले. त्यांना विरोधी पक्षनेते विजय कुंभार यांनीही सहकार्य केले होते. तथापि आता कुंभार यांना संधी मिळाल्याने त्यांच्या समर्थकांत उत्साहाचे वातावरण आहे. पालिकेच्या सभागृहात कुंभार राष्ट्रवादीच्या विरोधात एकाकी लढताना दिसतात. त्यांना शिवसेनेचे नगरसेवक आनंदराव पवार आणि महाडिक गटाचे कपिल ओसवाल यांची साथ मिळत नसल्याने पालिकेतील विरोधी पक्ष दुबळा झाला आहे. आता मात्र त्यांना बाजार समितीतील घोटाळे बाहेर काढण्याची संधी मिळाली आहे. त्यांच्या साथीला शिवाजीराव मोरे हेही आले आहेत.
बाजार समितीचे उत्पन्न कमी होत आहे. उत्पन्नवाढीच्या दृष्टिकोनातून बाजार समितीचे प्रयत्न कमी पडत आहेत. आवारातील सर्वच भूखंड राजकीय मंडळींनी हडप केले आहेत. यावर भाजपचे तत्कालीन नगरसेवक बाबा सूर्यवंशी यांनी आवाज उठविला होता. मात्र त्यानंतर विरोधकांचा आवाज दबला होता. आवाज उठविण्याची आता संधी आली आहे.
उत्पन्न वाढविणार : आनंदराव पाटील
आमदार जयंत पाटील आणि विलासराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली असलेले संचालक बाजार समितीचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. चांगल्या दर्जाची गोदामे बांधून उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. विरोधी पक्षातील कुंभार आणि मोरे यांची नियुक्ती शासनाने केली आहे. ते त्यांची भूमिका विरोधी बाकावर बसून पार पाडतील, अशी प्रतिक्रिया इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती आनंदराव पाटील यांनी दिली.