वाळवा तालुक्यात भाजपची गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:24 AM2021-02-12T04:24:16+5:302021-02-12T04:24:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : वाळवा तालुक्यात बूथ कमिट्या सक्षम करण्याची तयारी भाजपकडून सुरू होणार आहे. त्याआधी तालुका कार्यकारिणीची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : वाळवा तालुक्यात बूथ कमिट्या सक्षम करण्याची तयारी भाजपकडून सुरू होणार आहे. त्याआधी तालुका कार्यकारिणीची निवड क्रमप्राप्त आहे; परंतु गटबाजीमुळे अध्यक्षपद कोणाकडे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यातूनच कार्यकारिणी निवडीचे घोडे अडले आहे.
वाळवा तालुक्यात राष्ट्रवादीच्या ताकदीपुढे भाजप टिकविण्यात नगरसेवक बाबासाहेब सूर्यवंशी, विक्रम पाटील यांचे योगदान आहे. मधील काळात रयत क्रांती संघटनेचे आमदार सदाभाऊ खोत यांच्या प्रयत्नातून नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत पाटील यांची बंडखोरी भाजपच्या तोट्याची ठरली. त्यातून निशिकांत पाटील यांनी भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षपदावरून आणि प्रसाद पाटील यांची तालुकाध्यक्षपदावरून उचलबांगडी झाली. तालुका कार्यकारिणीही बरखास्त झाली. आज दीड वर्षाहून अधिक काळ लोटला, तरीही तालुका कार्यकारिणीची घोषणा झालेली नाही. आता अध्यक्षपद कोणाला, यावरून निवडीचे घोडे अडले आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. भाजपमध्ये राहुल आणि सम्राट महाडिक यांची एंट्री झाली, तर नगरसेवक बाबासाहेब सूर्यवंशी यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाला. महाडिक, निशिकांत पाटील आणि विक्रम पाटील यांचे गट निर्माण झाले. या सर्वांना एकत्र आणण्याचे आव्हान आहे.
कोट
तालुकाध्यक्षपदाची धुरा १७ महिने सांभाळली. या कालावधीत ५७ गावांत भाजपचा झेंडा रोवला. घरोघरी कमळ चिन्ह पोहोचविले. आता पक्ष जो निर्णय घेईल, तो मला मान्य आहे.
- प्रसाद पाटील, माजी तालुकाध्यक्ष
कोट
आमचे नेते राहुल महाडिक आणि सम्राट महाडिक यांच्याकडे तालुकाध्यक्षपदाची मागणी केली आहे. ती जबाबदारी मिळाली, तर पक्षवाढीसाठी निष्ठेने काम करू.
- इसाक वलांडकर, उद्योजक, वाळवा
कोट
३० वर्षांहून अधिक काळ निष्ठेने काम करणारे कार्यकर्ते आहेत. फक्त गटबाजी आणि स्वार्थासाठी पदाची अपेक्षा करतात, त्यांना पद देणे योग्य नाही. अध्यक्ष निवडीबाबत गटा-तटाचा विचार करू नये. जो योग्य असेल त्याचीच निवड होईल. अशोकदादा पाटील यांच्या निष्ठेमुळेच भाजपला विधानसभेला ३३ हजार मते पडली होती.
- विक्रमभाऊ पाटील, गटनेते, भाजप
फोटो : निशिकांतदादा पाटील, राहुल महाडिक, विक्रमभाऊ पाटील