जिल्ह्यात ग्रामपंचायतींमध्ये भाजपची मुसंडी
By admin | Published: November 4, 2015 12:12 AM2015-11-04T00:12:59+5:302015-11-04T00:13:44+5:30
वीस ग्रामपंचायतींत कमळ फुलले : १९ राष्ट्रवादीकडे, तर ११ काँग्रेसकडे
सांगली : जिल्ह्यातील ५६ ग्रामपंचायतींचा निकाल मंगळवारी लागला. २२ गावांत सत्तांतर झाले. भाजपने तासगाव, पलूस, जत तालुक्यांत मुसंडी मारत २० ग्रामपंचायतींमध्ये कमळ फुलविले. १९ ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे, तर ११ ग्रामपंचायती काँग्रेसच्या ताब्यात राहिल्या आहेत. चार ठिकाणी संमिश्र यश मिळाले, तर शिवसेनेने खानापूर तालुक्यातील दोन ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या.
तासगाव तालुक्यातील ३६ पैकी १९ ग्रामपंचायतींत विद्यमान कारभाऱ्यांना हादरा देत सत्तांतर घडवून आणले गेले. या निवडणुकीत राष्ट्रवादीने गड शाबूत ठेवला. भाजपला अपेक्षित यशाने हुलकावणी दिली असली तरी, त्यांनी राष्ट्रवादीच्या तोडीस तोड वर्चस्व मिळविले. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या पश्चात झालेल्या या निवडणुकांना विशेष महत्त्व होते. राष्ट्रवादीकडून आमदार सुमनताई पाटील आणि भाजपकडून खासदार संजयकाका पाटील यांनी लक्ष केंद्रित केले होते. शिरगाव(वि.), हातनोली, गोटेवाडी, धोंडेवाडी, नरसेवाडी, डोर्ली, येळावी, राजापूर, वाघापूर आणि वडगाव या दहा ग्रामपंचायतींची सत्ता आबा गटाकडून काका गटाकडे गेली, तर निंबळक, बोरगाव, पेड, धामणी, लोकरेवाडी, धुळगाव या ग्रामपंचायतींची सत्ता काका गटाकडून आबा गटाकडे आली.
पलूस तालुक्यात काँग्रेसने आठ ठिकाणी विजय मिळविला, तर भाजप-राष्ट्रवादीने सहा ठिकाणी सत्ता मिळविली. भिलवडीत भाजप-राष्ट्रवादीने विजय मिळविला. माळवाडी व धनगावात सत्तांतर होऊन, त्या ग्रामपंचायती काँग्रेसकडून भाजप-राष्ट्रवादीकडे गेल्या. आंधळी, नागराळे या दोन महत्त्वाच्या गावांत काँग्रेसने सत्ता हिसकावून घेतली. कवठेमहांकाळ तालुक्यात अलकूड (एस) ग्रामपंचायतीत राजाराम जानकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास पॅनेलने सहा जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळविले. जत तालुक्यातील उमराणी येथे काँग्रेसने वर्चस्व कायम राखले. (प्रतिनिधी) /सविस्तर वृत्त : हॅलो सांगलीत