कडक निर्बंधांच्या विरोधात भाजपचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:28 AM2021-04-09T04:28:03+5:302021-04-09T04:28:03+5:30
सांगली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य शासनाने लागू केलेल्या कडक निर्बंधाच्या विरोधात गुरुवारी सांगलीकरांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा काढून निर्णयाचा ...
सांगली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य शासनाने लागू केलेल्या कडक निर्बंधाच्या विरोधात गुरुवारी सांगलीकरांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा काढून निर्णयाचा निषेध केला. भाजपच्या पुढाकाराने निघालेल्या या माेर्चात व्यापारी प्रतिनिधींनीही सहभाग घेतला होता. नियम शिथिल करण्याबाबत निर्णय न घेतल्याने शुक्रवारपासून सर्व व्यापार, व्यवसाय सुरू करण्याचा इशारा यावेळी आंदाेलकांनी दिला.
कोरोनाचा संसर्ग लक्षात घेऊन राज्य शासनाने सोमवारपासून कडक निर्बंधासह विकेंड लॉकडाऊन घोषित केला आहे. त्याचा विरोध करण्यासाठी गुरुवारी ‘आम्ही सांगलीकर’ नावाखाली सर्वपक्षीय व व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी गुरुवारी माेर्चा काढत आंदोलन केले.
जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘ब्रेक द चेन’च्या नावाखाली करण्यात आलेले लॉकडाऊन अन्यायकारक आहे. सर्व व्यवसाय बंद राहिल्याने नुकसान वाढत आहे. व्यापाऱ्यांसह कष्टकरी, मोलमजुरी करणाऱ्यांचेही हाल होत आहेत. गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे अगोदरच नुकसान झाले असताना आता पुन्हा एकदा त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून व्यापारी व्यवसाय करण्यास प्राधान्य देतात, तरीही कारवाई करून व्यवसाय बंद केले जात आहेत. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये शिथिलता द्यावी.
आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्राजक्ता कोरे, शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे, माजी आमदार दिनकर पाटील, शशिकांत गायकवाड, अतुल शहा, धीरज सूर्यवंशी, शेखर इनामदार, दीपक शिंदे-म्हैसाळकर, पृथ्वीराज पवार मोर्चात सहभागी झाले होते.
चौकट
दोन दिवसांचे लॉकडाऊन करा
अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय बंद ठेवण्याच्या निर्णयाला भाजपचा विरोध असल्याचे यावेळी आमदार गाडगीळ व खाडे यांनी सांगितले. शनिवार व रविवार या दोन दिवशीच्या लॉकडाऊनला कोणताही विरोध नसून कोरोनाविषयक नियमांचे पालन करून व्यवसायास परवानगीची मागणी करण्यात आली.
चौकट
अन्यथा शुक्रवारपासून दुकाने उघडणार
जिल्हा प्रशासनाच्यावतीने कोरोनाविषयक उपाययोजनांना व्यापाऱ्यांकडून व बाजारपेठेतील सर्व घटकांकडून सहकार्य करण्यात येईल; मात्र नियम शिथिल न केल्यास कारवाईची भीती न बाळगता शुक्रवारपासून सर्व दुकाने उघडणार असल्याचाही इशारा यावेळी देण्यात आला.