भाजपचा पालिकेचा बार फुसका ठरेल : जयंत पाटील -सांगलीत राष्ट्रवादीच्या बैठकीत रणनीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 12:00 AM2018-03-25T00:00:14+5:302018-03-25T00:00:14+5:30
सांगली : उमेदवार आयात करून महापालिकेत सत्तेचे गणित मांडणाऱ्या भाजपचा बार फुसकाच ठरणार आहे, अशी टीका राष्ट्रवादी चे नेते आ. जयंत पाटील यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केली.
सांगली : उमेदवार आयात करून महापालिकेत सत्तेचे गणित मांडणाऱ्या भाजपचा बार फुसकाच ठरणार आहे, अशी टीका राष्ट्रवादी चे नेते आ. जयंत पाटील यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केली.
राष्ट्रवादी ची जिल्हा कार्यकारिणीची बैठक येथील कार्यालयात शनिवारी सायंकाळी पार पडली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, महापालिकेत सत्तेवर येण्याचा दावा भाजप नेते वारंवार करीत आहेत. भाजपची येथील ताकद मर्यादित आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीची त्यांची मदार आयात उमेदवारांवरच असेल. त्यामुळे या निवडणुकीतही इनकमिंगशिवाय त्यांना थारा नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. त्यासाठी वाट्टेल ती आमिषे दाखविण्याचे काम भाजप नेत्यांकडून सुरू आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना हे पचनी पडणार नाही. शिवाय पक्षात घेतलेल्यांनाही थारा नाही. त्यामुळे त्यांच्या गळाला कोणी लागणार नाही. त्यामुळेच त्यांचा सत्तेचा बार फुसकाच ठरणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीबद्दल ते म्हणाले, आता कुठे प्रभागरचना झाली आहे. त्यानुसार आमच्या पक्षातील कार्यकर्त्यांशी चर्चा करून आघाडी करायची की नाही, याचा निर्णय घेऊ. रणनीती ठरविताना सर्वांना विश्वासात घेतले जाईल. राज्यातील भाजप सरकारने शेतकरी, व्यापारी सर्वांसाठीच अन्यायकारक धोरणे राबविली आहेत. यामुळे सरकारविरोधात राष्ट्रवादीने राज्यभर हल्लाबोल आंदोलन सुरू केले आहे. आता पश्चिम महाराष्ट्रातील हल्लाबोलची सुरुवात २ एप्रिलपासून कोल्हापुरातून होत आहे. सांगली जिल्ह्यातही ४ व ५ एप्रिल रोजी सात ठिकाणी हल्लाबोल सभा होणार आहेत. येत्या २ एप्रिलला सांगली, मिरजेत हल्लाबोल यात्रेच्या सभा होणार आहेत. सभेमध्ये राज्य शासनाने महापालिकेकडे दुर्लक्ष केल्यासह एकूणच कारभाराचा पंचनामा होईल. त्यानिमित्ताने राष्ट्रवादीच्या महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंगच फुंकले जाणार आहे.
राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक आ. पाटील यांच्या उपस्थितीत झाली. जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, अरुण लाड, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील, संचालक बी. के. पाटील, मनोज शिंदे, ताजुद्दीन तांबोळी, युवकचे जिल्हाध्यक्ष भरत देशमुख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील युवक राष्ट्रवादीच्या कामकाजाचा आढावा घेतला.
या बैठकीला जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिनकर पाटील, अविनाश पाटील, जिल्हा परिषदेतील गटनेते शरद लाड, सुरेश शिंदे, चन्नाप्पा होर्तीकर, रमेश पाटील, आप्पासाहेब हुळ्ळे, हणमंत देशमुख, अॅड. बाबासाहेब मुळीक, किसन जानकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
जमत नसेल तर पदे सोडा!
जयंत पाटील यांनी आज उपद्रवी कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावले. मिरज तालुक्यातील युवक राष्टÑवादी अध्यक्षाने बुथ कमिट्या निवडीत वरिष्ठ नेत्यांचा हस्तक्षेप होत असल्याची तक्रार थेट जयंत पाटील यांच्याकडे केली. त्यावर नाराजी व्यक्त करताना जयंत पाटील म्हणाले की, राजकारणात अडचणी येत असतात. पक्षातही काही मंडळी जाणीवपूर्वक अडचणी आणतात. पण आवड असेल तरच राजकारणात या, हे आपले सरळ गणित आहे. ज्यांना राजकारणात टिकायचे आहे, त्यांनी धडपड केली पाहिजे. कागदोपत्री नियुक्ती करू नका, गावात जाऊन बैठका घ्या. जर तुम्हाला जमत नसेल तर पदे सोडा, असा दमही त्यांनी भरला.
चमकोगिरी नको!
बुथ कमिट्यांवर सक्रिय आणि मतदार खेचणारे कार्यकर्ते हवे आहेत. गावातील प्रत्येक गटाला विश्वासात घेऊन बुथ कमिट्या नेमायला हव्यात. हे काही इव्हेंट मॅनेजमेंट नव्हे. गावात फलक लावून फोटो फेसबुकवर अपलोड करणारे नको आहेत. मतदारांपर्यंत पोहोचले पाहिजे, असेही जयंतरावांनी सुनावले.