भाजपचीच सत्ता
By admin | Published: March 20, 2017 11:48 PM2017-03-20T23:48:37+5:302017-03-20T23:48:37+5:30
शिवसेनेच्या पाठिंब्याने मार्ग मोकळा : घोरपडे गटाचा निर्णय प्रलंबित, जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी डी. के. पाटील यांचे नाव आघाडीवर
सांगली : संख्याबळासाठी निर्णायक ठरणाऱ्या पक्ष व आघाड्यांसाठी सोमवारी दिवसभर भाजप आणि दोन्ही काँगे्रसमध्ये रस्सीखेच सुरू होती. अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. रात्री उशिरा शिवसेना नेते आ. अनिल बाबर यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केल्याने भाजपचा सत्तेचा मार्ग मोकळा झाला.
भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी सोमवारी रात्री पत्रकारांशी बोलताना ३५ संख्याबळ असल्याचा दावा केला, तर काँग्रेसचे नेते पतंगराव कदम यांनी, अपेक्षित संख्याबळ गाठणार असल्याचे स्पष्ट केले होते. सोमवारी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीच्या निमित्ताने सत्ता स्थापन कोण करणार, याबद्दलची उत्सुकता शिगेला गेली आहे. सोमवारी सांगलीत दिवसभर वेगवान राजकीय हालचाली झाल्या.
पतंगराव कदम यांच्या सांगलीतील निवासस्थानी सायंकाळी बैठक झाली. या बैठकीस काँग्रेसचे नेते आ. पतंगराव कदम, राष्ट्रवादीचे नेते आ. जयंत पाटील, आ. सुमनताई पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष ) दिलीपतात्या पाटील, विश्वजित कदम, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कुमार पाटील आदी उपस्थित होते. रात्री उशिरा पुन्हा माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्याशीही जयंत पाटील यांनी स्वतंत्रपणे जिल्हा बँकेत चर्चा केली. शिवसेना आमदार अनिल बाबर यांनाही दोन्ही काँग्रेस नेत्यांनी बैठकीसाठी निमंत्रित केले होते. मात्र ते उपस्थित राहिले नाहीत.
दुसरीकडे भाजपची पोलिस मुख्यालयासमोरील एका हॉटेलमध्ये पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत बैठक झाली. खासदार संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, आ. विलासराव जगताप, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आदी उपस्थित होते. या बैठकीत सत्तास्थापनेसाठी करावयाच्या तडजोडींचे अधिकार संजयकाकांकडे सोपविण्यात आले. त्यानंतर संजयकाकांनी शिवसेना, घोरपडे गटाशीही चर्चा केली. दोन्ही काँग्रेस नेत्यांनी शिवसेनेला पदांचीही आॅफर दिली होती. भाजपला या गोष्टीची कल्पना आल्यानंतर त्यांनीही बाबर यांना चर्चेला बोलाविले. चर्चेचे हे गुऱ्हाळ रात्री उशिरा संपले. महाबळेश्वर सहलीवर गेलेले भाजपचे २0 सदस्य सोमवारी रात्री कोल्हापुरात दाखल झाले होते. अध्यक्ष निवडीपूर्वी ते कोल्हापुरातून सांगलीत येणार आहेत. (प्रतिनिधी)
भाजपमध्ये मतभेद
भाजपमध्ये तडजोडीच्या चर्चेवरून पृथ्वीराज देशमुख आणि संजयकाका पाटील यांच्यात मतभेद झाल्याचे समजते. त्यामुळे बैठकांमध्ये बराच वेळ निर्णय होऊ शकला नाही. सुभाष देशमुख यांनी हा वाद मिटविला. अध्यक्षपदाच्या नावावरून भाजपच्या या दोन नेत्यांचे सूर बिघडले. पालकमंत्र्यांनी याबाबत आमदारांचे मत जाणून घेतले आहे.
संग्रामसिंह देशमुखही स्पर्धेत
अध्यक्षपदाच्या शर्यतीत रात्री उशिरा डी. के. काका पाटील यांचे नाव सर्वांत पुढे आले. संग्रामसिंह देशमुख यांचेही नाव स्पर्धेत असले तरी घटकपक्षांनी डी. के. यांच्या नावाला सर्वाधिक पसंती दर्शविल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अध्यक्षपदी आता कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.