सांगली विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे बंडखोर उमेदवार पप्पू डोंगरे यांची मालमत्ता २५ कोटींवर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 04:19 PM2024-10-30T16:19:53+5:302024-10-30T16:20:17+5:30
शिक्षण दहावीपर्यंत
सांगली : भाजपचे बंडखोर उमेदवार शिवाजी ऊर्फ पप्पू डोंगरे यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या नावे स्थावर व जंगम, अशी एकूण २५ कोटी ४१ लाख २९ हजार रुपयांची मालमत्ता दर्शविण्यात आली आहे. दुसरीकडे विविध वित्तीय संस्थांच्या कर्जाची रक्कम १६ कोटी ७९ लाख इतकी दाखविण्यात आली आहे.
सांगली मतदारसंघातून शिवाजी डोंगर यांनी भाजपकडे उमेदवारीची मागणी केली होती. आमदार सुधीर गाडगीळ यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी बंडखोरी करीत अर्ज दाखल केला आहे. अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी संपत्तीचे विवरण सादर केले. पत्नी विद्या, मुले योगेश व ऋतुराज यांच्या नावे असलेल्या संपत्तीची व कर्जाची माहितीही देण्यात आली आहे.
शिवाजी डोंगरे यांची संपत्ती अशी
- जंगम मालमत्ता : ५३,४३,५००
- स्थावर मालमत्ता : २४,८७,८५,५०१
- एकूण देणी : १६,७९,२९,७५०
पत्नी व मुलांच्या नावे २.८८ कोटी
पत्नी विद्या डोंगरे यांच्या नावे ३१ लाख ७७ हजार ५०० रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता, दोन्ही मुलांच्या नावे २ कोटी ५६ लाख ८३ हजार रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता नोंदविण्यात आली आहे. पत्नी व मुलांच्या नावे एकूण २ कोटी ८८ लाख ६० हजार ५०० रुपये संपत्ती आहे.
शिक्षण दहावीपर्यंत
डोंगरे यांचे शिक्षण दहावी पास इतके आहे. शासकीय जागेत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा उभारल्याबाबतचा एक गुन्हा त्यांच्यावर दाखल असल्याची माहिती प्रतिज्ञापत्रात दिली आहे.