शिराळ्यात दोघा ‘भाऊं’मध्येच लढत; सम्राट महाडिक यांचे माघारीचे संकेत, मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीनंतर निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 05:58 PM2024-11-01T17:58:03+5:302024-11-01T17:58:25+5:30
शिराळा : शिराळा विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार सम्राट महाडिक यांनी अखेर उमेदवारी मागे घेण्याचे जाहीर केले. त्यामुळे आता ...
शिराळा : शिराळा विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार सम्राट महाडिक यांनी अखेर उमेदवारी मागे घेण्याचे जाहीर केले. त्यामुळे आता महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार मानसिंगराव नाईक आणि भाजप महायुतीचे सत्यजित देशमुख या दोघा ‘भाऊं’मध्येच मुख्य लढत होणार हे स्पष्ट झाले आहे.
मतदारसंघात शिराळा व वाळवा तालुक्यातील ४८ गावांचा समावेश आहे. तेथे विधानसभा निवडणुकीत आमदार जयंत पाटील व माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी आमदार मानसिंगराव नाईक यांना पाठबळ दिले आहे. २०१९ मध्ये शिवाजीराव नाईक भाजपचे उमेदवार होते. त्यावेळी सत्यजित देशमुख त्यांच्यासोबत होते. त्यावेळी सम्राट महाडिक यांनी बंडखोरी केली होती. त्यांना ४६ हजार मते मिळाली होती. त्यांच्या बंडखोरीचा फटका भाजपला बसल्याचे स्पष्ट झाले होते. त्याची गांभीर्याने दखल घेत यावेळीही फटका बसू नये याची काळजी भाजप श्रेष्ठींनी घेतली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासोबत महाडिक कुटुंबीयांची मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर बैठक झाली. तेथील चर्चेअंती सम्राट महाडिक यांनी उमेदवारी मागे घेण्याचे जाहीर केले. या निर्णयामुळे महाडिक यांची ताकद सत्यजित देशमुख यांना मिळणार आहे.
दरम्यान, प्रचारसभा, गावभेटी, वैयक्तिक भेटी, कार्यकर्त्यांचे रुसवेफुगवे दूर करण्याची धडपड, नेत्यांच्या कोलांटउड्या यामुळे मतदारसंघातील राजकीय वातावरण तापले आहे. निनाईदेवी कारखान्याची विक्री, कागदावरच असणारे मागासवर्गीय वसतिगृह, छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतिस्थळाचा निधी अडविणे आदी मुद्द्यांवर सत्यजित देशमुख यांची कोंडी करण्याचा प्रयत्न नाईक गट करीत आहे, तर सत्यजित देशमुख यांनी विराज उद्योगसमूहातून स्वतःची प्रगती, नाईक यांची अजित पवार यांच्याशी सलगी आदी मुद्द्यांवर प्रचाराच्या केंद्रस्थानी आहे.
२०१९च्या निवडणुकीतील उमेदवारनिहाय मते
- मानसिंगराव नाईक (राष्ट्रवादी कॉंग्रेस) - १,०१,९३३
- शिवाजीराव नाईक (भाजप) - ७६,००२
- सम्राट महाडिक (अपक्ष) - ४६,२३९
- २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील शिराळा मतदारसंघातील स्थिती
- धैर्यशील माने - ८०,७२०
- सत्यजित पाटील - ९०,००१
- राजू शेट्टी - १७,४९९