सांगलीतील तिन्ही उमेदवारांना स्वकीयांचा धोका, सर्वपक्षीय कार्यकर्ते संभ्रमावस्थेत
By अविनाश कोळी | Published: April 17, 2024 06:53 PM2024-04-17T18:53:53+5:302024-04-17T18:54:49+5:30
पक्षाचे ऐकायचे की नेत्यांचे?
अविनाश कोळी
सांगली : लोकसभेच्या निवडणुकीत सांगली मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांना स्वकीयांचीच चिंता सतावत आहे. महाविकास आघाडी व महायुतीअंतर्गत मित्रपक्षांमध्ये समन्वयाचा गोंधळ असतानाच उमेदवारांना त्यांच्याच पक्षातील किंवा मित्रपक्षातील नाराजी, गटबाजीचा सामना करावा लागत आहे. यामुळे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये प्रचारावरून संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
भाजपतर्फे खासदार संजय पाटील, उद्धवसेनेतर्फे चंद्रहार पाटील व काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील, असे तीन प्रमुख उमेदवार रिंगणात असतील. चंद्रहार पाटील यांना मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसच्या बंडखोरीची चिंता सतावत आहे. सांगलीच्या जागेवरून उद्धवसेना व काँग्रेसमध्ये निर्माण झालेला वाद अजूनही कायम आहे.
महाविकास आघाडीच्या नुकत्याच झालेल्या मेळाव्यावर स्थानिक काँग्रेस नेत्यांनी बहिष्कार टाकला. काँग्रेस व उद्धवसेनेच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपही झाले आहेत. घटक पक्ष असूनही त्यांचे सूर बिघडले आहेत. आघाडीच्या मेळाव्यातही चंद्रहार पाटील यांनी भाजपपेक्षा काँग्रेसच्या भूमिकेवर अधिक टीका केली. काँग्रेसचे नेतेही भाजपपेक्षा उद्धवसेनेवर अधिक संताप व्यक्त करताना दिसत आहेत.
विशाल पाटील यांनी बंडखोरी केल्यानंतर आता त्यांनाही चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीमुळे मतविभागणीची चिंता वाटत आहे. पक्षांतर्गत काही अडचणी नसल्या, तरी महाविकास आघाडीअंतर्गत त्यांच्यासाठी चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.
राष्ट्रवादीही आघाडीचे कर्तव्य म्हणून उद्धवसेनेसोबत दिसत आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत राष्ट्रवादी ‘वेट ॲंड वॉच’च्या भूमिकेत होती. आता राष्ट्रवादी व उद्धवसेना एकत्रित असून, काँग्रेस नेत्यांनाही आघाडीच्या कर्तव्य भावनेतून त्यांच्यासोबत राहावे लागू शकते. अशावेळी विशाल पाटील यांना त्यांच्या स्वकीयांचीही साथ लाभेल की नाही, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.
भाजप उमेदवाराला स्वकीयांचा त्रास
भाजपचे उमेदवार संजय पाटील यांनाही स्वकीयांचा त्रास जाणवत आहे. जतचे माजी आमदार विलासराव जगताप व माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी उमेदवारीवर टीका केली. आता जगतापांनी पक्ष साेडला आहे. देशमुख पक्षात असूनही नाराज आहेत. मिरजेतील भाजपच्या माजी नगरसेवकांनीही विशाल पाटील यांच्याशी सलगी केली आहे.
पक्षाचे ऐकायचे की नेत्यांचे?
भाजपच्या राज्य स्तरावरील नेत्यांकडून कधी ऑफलाइन तर कधी ऑनलाइन बैठका घेतल्या जात आहेत. भाजपसाठी प्रामाणिक प्रचार करण्याच्या सूचना ते देत आहेत. दुसरीकडे पक्षातील नाराज नेते उमेदवाराच्या प्रचारापासून कार्यकर्त्यांना परावृत्त करताना दिसत आहेत. त्यामुळे पक्षाचे ऐकायचे की नेत्यांचे, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.