सांगली महापालिकेत भाजपचे ‘सोशल इंजिनिअरिंग’ : लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर समीकरणे जुळविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 12:20 AM2018-08-21T00:20:10+5:302018-08-21T00:21:14+5:30

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यावर कब्जा केल्यानंतर भाजपने महापालिकेत पदाधिकारी निवडताना सोशल इंजिनिअरिंंगवर भर दिला आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका लक्षात घेत जातीय समीकरणेही जुळविण्याचा प्रयत्न चालविला आहे.

BJP's 'social engineering' in Sangli municipal: Trying to match equations on the face of Lok Sabha and Vidhan Sabha elections | सांगली महापालिकेत भाजपचे ‘सोशल इंजिनिअरिंग’ : लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर समीकरणे जुळविण्याचा प्रयत्न

सांगली महापालिकेत भाजपचे ‘सोशल इंजिनिअरिंग’ : लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर समीकरणे जुळविण्याचा प्रयत्न

Next
ठळक मुद्दे महापौर-उपमहापौर निवड

शीतल पाटील ।
सांगली : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यावर कब्जा केल्यानंतर भाजपने महापालिकेत पदाधिकारी निवडताना सोशल इंजिनिअरिंंगवर भर दिला आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका लक्षात घेत जातीय समीकरणेही जुळविण्याचा प्रयत्न चालविला आहे. महापौर, उपमहापौर व गटनेता निवडीतून ही बाब प्रकर्षाने समोर आली. आता भविष्यात विविध विषय समित्यांचे सभापती व स्थायी समितीचे सभापतीपदही याच समीकरणातून दिले जाणार असल्याचे स्पष्ट झाले.

गेल्या चार वर्षात लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपने जिल्ह्यात घवघवीत यश मिळविले. वसंतदादांचा जिल्हा कधी भाजपमय झाला, हे काँग्रेसवाल्यांनाही कळले नाही. जिल्ह्यातील जनतेनेही एक खासदार, चार आमदार भाजपच्या पारड्यात टाकले. त्यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत भाजपचा आलेख वाढतच गेला. जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप जिल्ह्यात एक नंबरचा पक्ष बनला. कधीकाळी शहरी पक्ष म्हणून भाजपची ओळख होती. पण ग्रामीण भागातही भाजपने पाय रोवल्याचे दिसून येते. महापालिका हे एकमेव सत्तास्थान काँग्रेसकडे होते.

दीड महिन्यापूर्वी महापालिकेत भाजपची सत्ता येईल की नाही, याविषयी राजकीय वर्तुळातही साशंकता होती. अगदी निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत तरी भाजप सत्तेपर्यंत पोहोचणार नाही, असा अंदाज व्यक्त होत होता. पण सर्व राजकीय आखाडे धुळीस मिळवित भाजपने महापालिकेवर एकहाती सत्ता मिळविली व २० वर्षांपासूनचा काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ढासळला. आता संपूर्ण जिल्हा भाजपमय झाला आहे. त्यात पुढीलवर्षी होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या यशाची पेरणीही भाजपने यानिमित्ताने केली. केवळ महापालिकेवर सत्ता मिळाली, म्हणजे मोठ्या निवडणुका जिंकता येत नाहीत, याचा अंदाज भाजप नेत्यांनाही आहे. २०१३ च्या निवडणुकीत काँग्रेसचे मदन पाटील यांनी एकहाती सत्ता आणली होती. पण २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. हा इतिहास ताजा असल्याने भाजपने महापालिका पदाधिकारी निवडीतून सोशल इंजिनिअरिंंगचा प्रयोग करून आगामी निवडणुकीसाठी पक्षाची बांधणी आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न चालविला आहे.

महापालिकेचे महापौरपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. या पदासाठी भाजपमधून आठ नगरसेविका इच्छुक होत्या. त्यात धनगर, लिंगायत, मुस्लिम समाजाच्या नगरसेविकांचा समावेश आहे. महापालिका हद्दीत धनगर समाजाची मोठी व्होटबँक आहे. ती लक्षात घेत भाजपने पहिल्या महापौर पदाचा मान धनगर समाजाला दिला.

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाचे आरक्षण आंदोलन पेटले होते. त्याचे चटके भाजपला बसू नयेत, यासाठी उपमहापौर व गटनेतेपदी मराठा समाजातील नगरसेवकांची निवड करण्यात आली. मराठा व धनगर समाजाचे समीकरण जुळविण्यात सध्या तरी भाजपला यश आले आहे. पुढील महिन्यात स्थायी समिती सभापती व सदस्य निवड, चार प्रभाग समित्यांचे सभापती, मागासवर्गीय समितीचे सभापती अशा विविध विषय समित्यांच्या निवडी पार पडणार आहेत. या निवडीत सोशल इंजिनिअरिंंगचा वापर करून पदाधिकारी निवडी करणार असल्याचे भाजपच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे. या नव्या प्रयोगाचा भाजपला कितपत फायदा होतो, हे आगामी निवडणुकीत दिसून येईल. सध्या तरी भाजपची चढती कमान कायम आहे, असेच म्हणावे लागेल.

स्वीकृत सदस्य, स्थायीसाठी चढाओढ
भाजपमध्ये स्थायी समिती सभापती व स्वीकृत नगरसेवकांसाठी मोठी चढाओढ राहणार आहे. भाजपच्या वाट्याला स्वीकृतच्या तीन जागा येणार आहेत. त्यापैकी शेखर इनामदार यांची निवड निश्चित मानली जात आहे. ते ब्राह्मण समाजाचे आहेत. आता इतर दोन जागांसाठी इच्छुकांची मोठी गर्दी आहे. निवडणुकीतही भाजपने सर्वाधिक मुस्लिम उमेदवार दिले होते. त्यांचा प्रचारही भाजपने केला होता. त्यामुळे आता कोणत्या समाजाला स्वीकृत नगरसेवक पदाची लॉटरी लागते, याचीही उत्सुकता आहे. स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपमध्ये रस्सीखेच आहे. दिनकरतात्या पाटील यांचे चिरंजीव अजिंक्य पाटील यांचे नाव आघाडीवर असले तरी, मिरजेतून पांडुरंग कोरे, शिवाजी दुर्वे यांनीही सभापती पदावर दावा करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे आता हे समीकरण भाजपचे नेते कसे जुळवितात, हे पाहणेही रंजक आहे.

खोत, सूर्यवंशी दोघेही अनुभवी
महापालिकेच्या नव्या सभागृहात भाजपचे ४१ नगरसेवक असले तरी, प्रत्यक्षात सभागृहात बोलणारे अगदीच हाताच्या बोटावर मोजण्याइतपत आहेत. दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादीकडे मात्र अनुभवी नगरसेवकांचा भरणा आहे. महासभेत विरोधकांचे आक्रमण थोपविण्यासाठी महापौरपदी अनुभवी नगरसेविका असावी, अशी चर्चा भाजप नेत्यांत झाली. त्यातूनच निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या संगीता खोत यांना महापौर पदाची लॉटरी लागली. खोत या तीनवेळा निवडून आल्या आहेत. तसेच त्या आक्रमकही आहेत. उपमहापौर धीरज सूर्यवंशी हे दुसºयांदा नगरसेवक झाले आहेत. त्यांनाही मागील पाच वर्षाच्या कामकाजाचा अनुभव आहे.
 

महापालिकेतील भाजपचे सर्व नगरसेवक पारदर्शी कारभार करतील. त्यांच्या कारभारावर कोणताही आक्षेप येणार नाही. महापालिका क्षेत्राच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणून हे शहर चांगले बनवू.
- सुधीर गाडगीळ, आमदार

भाजपवर मोठा विश्वास दाखवित जनतेने क्रांती घडविली आहे. या विश्वासाला पात्र राहून जनतेच्या मागण्या पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहील. अल्पावधित या शहराचा विकास झाल्याचे दिसून येईल.
- सुरेश खाडे, आमदार

महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराने बरबटलेल्या कारभाराला मतदारांनी झिडकारत भाजपच्या हाती सत्ता दिली आहे. सर्वांचे सूक्ष्म नियोजन, विकासात्मक चेहºयामुळे पक्षाला यश मिळाले. गेली पाच वर्षे महापालिकेत जनतेच्या अहिताचाच कारभार सुरू होता. भाजपचे पदाधिकारी पारदर्शी कारभार करून जनतेच्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण करतील. मुख्यमंत्र्यांनीही १०० कोटींचा निधी देऊन चांगली सुरुवात केली आहे. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच इतका मोठा निधी आला आहे.
- संजयकाका पाटील, खासदार

महापालिका क्षेत्राचा चेहरामोहरा बदलण्यासाठी जनतेने भाजपला सत्ता दिली आहे. त्याला कटिबद्ध राहून पारदर्शी कारभार केला जाईल. पुढील दोन ते तीन महिन्यातच जनतेला बदल दिसेल.
- दिनकरतात्या पाटील, माजी आमदार

सांगलीच्या जनतेला मोठा बदल हवा होता. त्यासाठी भाजपला कौल दिला आहे. सर्वांच्या सहकार्याने तीनही शहरांचा विकास करण्यावर आमचा भर राहील.
- मकरंद देशपांडे, प्रदेश सरचिटणीस

सांगलीच्या जनतेने भाजपवर विश्वास टाकला आहे. गेल्या ५० वर्षांत जे घडले नाही, ते पुढील तीन ते चार वर्षांत जनतेला विकासाच्या रूपात दिसेल. पुढील ५० वर्षे तरी भाजपची सत्ता महापालिकेवर राहील.
- पृथ्वीराज देशमुख, ग्रामीण जिल्हाध्यक्ष

गेल्या चार वर्षांत जिल्हा भाजपमय झाला आहे. शहराचा विकास केवळ भाजपच करू शकते, हे जनतेला कळले आहे. त्यामुळे महापालिकेची सत्ताही भाजपच्या हाती दिली आहे. गेली पाच वर्षे काँग्रेसने महापालिकेत भ्रष्ट कारभार केला. आम्ही चांगल्या पद्धतीने कारभार करून जनतेच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करू.
- शेखर इनामदार, भाजप नेते
 

 

Web Title: BJP's 'social engineering' in Sangli municipal: Trying to match equations on the face of Lok Sabha and Vidhan Sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.