शेट्टी, घोरपडेंची समजूत काढण्यात भाजपला यश
By admin | Published: April 5, 2017 11:52 PM2017-04-05T23:52:52+5:302017-04-05T23:52:52+5:30
मुंबईत बैठक : महाडिक गटालाही दुसऱ्या टप्प्यात संधी; जिल्हा परिषद सभापतींच्या आज निवडी
सांगली : जिल्हा परिषद विषय समिती सभापती पदाची संधी देण्यात डावलल्यामुळे खासदार राजू शेट्टी आणि स्वाभिमानी विकास आघाडीचे माजी मंत्री अजितराव घोरपडे नाराज होते. यांची नाराजी दूर करण्यात बुधवारी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना यश आले. जिल्हा परिषद विषय समितीच्या निवडी गुरुवार दि. ६ एप्रिल रोजी सुरळीत पार पडतील, असा भाजप नेत्यांना विश्वास आहे.
मुंबईत जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांचे वाटप करण्यासाठी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख, खासदार संजयकाका पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, आमदार विलासराव जगताप, आ. शिवाजीराव नाईक, आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, गोपीचंद पडळकर यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते.
या बैठकीमध्ये शिवसेना आणि रयत विकास आघाडीला पहिल्या टप्प्यामध्ये संधी देण्याचा निर्णय झाला. रयत विकास आघाडीतील दुसरा गट नानासाहेब महाडिक गटाला आणि स्वाभिमानी विकास आघाडीतील घोरपडे गट, स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील सदस्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये संधी देण्याचा निर्णय भाजपच्या नेत्यांनी घेतला आहे.
शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास बाबर यांना संधी मिळाली आहे. त्यांना कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापतीपद देण्याचा निर्णय सोमवारी भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत झाला होता. याच निर्णयावर बुधवारच्या बैठकीमध्येही शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे. परंतु, या समितीवर बाबर नाराज असल्यामुळे, अंतिमक्षणी समिती वाटपात बदल होण्याची शक्यताही आहे.
रयत विकास आघाडीच्या प्रा. डॉ. सुषमा नायकवडी (वाळवा) यांना महिला-बालकल्याण, गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मदेव पडळकर यांना समाजकल्याण सभापतीपद देण्याचा अंतिम निर्णय झाला आहे.
मिरज तालुक्यातून अरुण राजमाने (मालगाव) यांच्याकडे बांधकाम-अर्थ सभापतीपद देण्याचाही निर्णय झाला आहे. राजमाने आ. सुरेश खाडे समर्थक आहेत. राजमाने निवडणुकीच्या आधी काही दिवस राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेले होते. मिरज तालुक्यातीलच बेडग गटातील मनोजकुमार मुंदगनूर हेही इच्छुक आहेत. यांच्या नावाबद्दलही रात्री उशिरापर्यंत चर्चा चालू होती.
जत तालुक्यातून भाजपला सहा जागा मिळाल्यामुळे आ. विलासराव जगताप गटाला शिक्षण-आरोग्य समिती सभापतीपद देण्याचे निश्चित झाले आहे. जगताप सांगतील त्यांना संधी मिळणार आहे. या गटातून सरदार पाटील (दरीबडची, ता. जत), तमनगौडा रवी (जाडरबोबलाद, ता. जत) यांची नावे चर्चेत आहेत. सरदार पाटील यांचे नाव आघाडीवर असल्याचे खात्रीशीर सूत्रांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)