वाळवा-शिराळ्यात भाजपच ‘टार्गेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 01:03 AM2018-03-22T01:03:45+5:302018-03-22T01:03:45+5:30

BJP's 'Target' in dry season | वाळवा-शिराळ्यात भाजपच ‘टार्गेट’

वाळवा-शिराळ्यात भाजपच ‘टार्गेट’

Next
ठळक मुद्देराष्टवादी, काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आघाडी : हुतात्मा, महाडिक गटाची भूमिका गुलदस्त्यात

अशोक पाटील ।
इस्लामपूर : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी वाळवा आणि शिराळा तालुक्यात भाजपची हवा केली आहे. त्यामुळे आमदार जयंत पाटील, माजी आमदार मानसिंगराव नाईक, सत्यजित देशमुख, खासदार राजू शेट्टी यांची आघाडी होत आहे.

शेट्टी यांनी दोन्ही काँग्रेसला जवळ केले आहे. त्यामुळे सर्व राजकीय समीकरणे बदलली आहेत. आता दोन्ही तालुक्यात आघाडीचे भाजप हेच टार्गेट असणार आहे. याउलट राजकारणात तग धरून असलेले वैभव नायकवडी, नानासाहेब महाडिक यांची भूमिका गुलदस्त्यात आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीला खा. राजू शेट्टी यांनी कडवे आव्हान दिले होते. शेट्टी यांच्याविरोधात अंतिम टप्प्यापर्यंत उमेदवारच नव्हता. अखेरच्याक्षणी काँग्रेसचे कल्लापाण्णा आवाडे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकण्यात आली. यावेळी खासदार शेट्टी यांच्या पाठीशी हुतात्मा गट, महाडिक गट, भाजप व काँग्रेसचे काही चेहरे दिसत होते. परंतु यावेळेला राजकीय समीकरणे बदलली आहेत. खा. शेट्टी यांनी महायुतीतून बाहेर पडून काँग्रेसशी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे जे गतवेळेला सोबत होते, ते आता विरोधात जाणार आहेत. गतवेळी जी अवस्था काँग्रेस, राष्ट्रवादीची होती, तीच वेळ भाजपवर आली आहे. त्यामुळे भाजपला लोकसभेला उमेदवारी देताना मोठी कसरत करावी लागणार आहे.

शिराळ्यात आ. शिवाजीराव नाईक यांच्याबरोबर खा. शेट्टी, मंत्री सदाभाऊ खोत प्रचार यंत्रणेत होते. आता मात्र शिराळा मतदारसंघात उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. आ. नाईक यांनी सदाभाऊ खोत यांची साथ घेऊन विकास कामांचा धूमधडाका सुरु केला आहे, तर खा. शेट्टी यांनी काँग्रेसला जवळ केल्यामुळे आगामी काळात दोन भाऊंच्या साथीला शेट्टी असणार आहेत. त्यामुळे दोन भाऊंच्या समझोता एक्स्प्रेसला गती मिळणार आहे. त्यांच्याकडून भाजप हाच पक्ष टार्गेट असणार आहे.
इस्लामपूर मतदार संघातही शेट्टींच्या पाठिंब्यामुळे समीकरणे बदलणार आहेत. शेट्टी ऊस दर आंदोलनावेळी आ. पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडत होते. परंतु आता आ. पाटीलच शेट्टी यांच्या सभांमधून भाजपवर टीका करताना दिसतील.

राजू शेट्टींची : शिट्टी घुमणार
आ. जयंत पाटील यांच्या प्रचार सभांमधून खा. शेट्टी यांची शिट्टी घुमणार आहे. दोघांपुढे भाजपचा टिकाव लागणार का, हे येणारा काळ ठरवेल. पेठनाक्यावरील महाडिक व वाळव्याचे नायकवडी यांनी स्वत:चे जिल्हा परिषद मतदारसंघ आणि संस्थांचा विकास साधण्यासाठी गरज पडेल त्या नेत्याला जवळ केले आहे. त्यामुळे त्यांची भूमिका गुलदस्त्यातच राहिली आहे.

Web Title: BJP's 'Target' in dry season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.