युती तोडण्याचे पाप भाजपच्या तीन नेत्यांचेच : आदित्य ठाकरे
By admin | Published: October 13, 2014 10:37 PM2014-10-13T22:37:40+5:302014-10-13T23:03:03+5:30
२५ वर्षांची युती तोडण्याचे पाप शिवसेनेने केले नाही
विटा : गेल्या २५ वर्षांची युती तोडण्याचे पाप शिवसेनेने केले नाही, तर ते पाप भाजपच्या तीन नेत्यांचे असल्याचा आरोप शिवसेनेच्या युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी आज (सोमवारी) येथे केला. शिवसेनेचे उमेदवार अनिल बाबर यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सांगता सभेत ते बोलत होते. अभिनेते आदेश बांदेकर, अनिल बाबर, उपसभापती सुहास बाबर, अमोल बाबर, जिल्हा उपप्रमुख शिवाजी शिंदे, संजय विभुते, जि. प. सदस्य फिरोज शेख, विनोद गुळवणी उपस्थित होते. सभेनंतर बाबर यांनी विटा शहरातून रॅली काढली.ठाकरे म्हणाले की, संपूर्ण राज्यात भगवे वादळ आहे. शिवसेनेचे व्हिजन डॉक्युमेंट सर्वत्र पोहोचले आहे. भाजपला शिवसेनेची गरज नसल्याचे वाटत आहे. मात्र, सेनेच्या ‘जय महाराष्ट्र’चा नारा दिल्लीपर्यंत पोहोचवायचा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे दिल्ली व भाजपसमोर झुकले नाहीत. झुकले ते फक्त जनतेसमोरच. राज्यात शिवशाही आल्यानंतर पहिल्या १०० दिवसात सर्व सिंचन प्रकल्प मार्गी लावू.बाबर म्हणाले की, दुष्काळी जनतेला टेंभूचे पाणी मिळावे यासाठी संघर्ष केला. टेंभू पूर्ण करून पाणी देण्याची ग्वाही उध्दव ठाकरे यांनी दिल्यानंतरच मी पक्षांतर केले आहे. रवींद्र कदम, शंकर मोहिते, श्रीरंग पवार, संजय भिंगारदेवे, निवास पाटील, प्रताप पाटील, बाळासाहेब लकडे, सयाजीराव बाबर, शरद शहा, शेखर भिंगारदेवे, गणेश निकम, मनोज भगत उपस्थित होते. (वार्ताहर)