काँग्रेससमोर भाजपचे कडवे आव्हान
By admin | Published: February 1, 2017 11:22 PM2017-02-01T23:22:01+5:302017-02-01T23:22:01+5:30
दुधोंडी जि. प. गट : उमेदवार निवडीबाबत पक्षांकडून गोपनीयता; आरक्षणामुळे शांतता
सुनील तुपे, राकेश तिरमारे ल्ल किर्लोस्करवाडी, दुधोंडी
राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या दुधोंडी (ता. पलूस) जिल्हा परिषद गटास दुधोंडी व रामानंदनगर गणात उमेदवार निवडीबाबत पक्षांनी गुप्तता पाळली आहे. जिल्हा परिषद गटासाठी आरक्षणामुळे शांतता आहे. मात्र रामानंदनगर गणात चुरस वाढली आहे.
दुधोंडी गट ओबीसी महिलेसाठी आरक्षित आहे. भाजपकडे दह्यारीचे श्रीरंग ऊर्फ राजाभाऊ पाटील यांच्या पत्नी सौ. अश्विनी पाटील यांच्यारूपाने सक्षम उमेदवार मिळाला आहे, तर कॉँग्रेस व राष्ट्रवादीकडून मात्र उमेदवारांची शोधाशोध सुरू आहे. मागील निवडणुकीत कॉँग्रेस व राष्ट्रवादीत अटीतटीची लढत झाली होती. कॉँग्रेसचे हेमंत पाटील जिल्हा परिषद गटातून व मानसिंग बॅँकेचे संस्थापक जे. के. (बापू) जाधव यांच्या पत्नी सौ. निर्मलाताई पाटील दुधोंडी गणातून, तर यास्मिन पिरजादे रामानंदनगर गणातून विजयी झाल्या होत्या. तेव्हा कॉँग्रेससमोर राष्ट्रवादीचे कडवे आव्हान होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते पृथ्वीराज देशमुख, संग्रामसिंह देशमुख, क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी एकत्रित लढत दिली होती. तरीही कॉँग्रेसने बाजी मारली होती. यावेळी मात्र कॉँग्रेस, भाजप व राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत किंवा भाजप-राष्ट्रवादीची आघाडी झाली तर दुरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
पृथ्वीराज देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, तर अरुण लाड राष्ट्रवादीबरोबरच राहिले आहेत. मात्र माजी आमदार संपतराव देशमुख व जी. डी. (बापू) लाड यांचे जिव्हाळ्याचे संबंध सर्वज्ञात आहेत. त्यामुळे कडेगाव-पलूस तालुक्यात भाजप व राष्ट्रवादी एकत्र लढण्याची शक्यता जास्त आहे. या दोन पक्षातील दरीचा फायदा कॉँग्रेसला मिळणार आहे, हेही तितकेच खरे आहे. त्यामुळे साटेलोटे करून हे दोन्ही पक्ष एकत्रित लढतील, अशी चर्चा आहे.
पलूस-कडेगाव मतदार संघात कॉँग्रेसचे माजी मंत्री आ. पतंगराव कदम यांचे वर्चस्व असले तरीही कॉँग्रेसला कोणतीही निवडणूक सहजासहजी जिंकता आलेली नाही. त्यांना विजयासाठी संघर्ष करावाच लागला आहे. या निवडणुकीत कॉँग्रेससमोर भाजपचे कडवे आव्हान आहे. घटक पक्ष असलेले आरपीआय, शेतकरी संघटना, शिवसेना आदींना सामावून घेऊन भाजप त्यांची नाराजी कशी दूर करणार, हेही तितकेच महत्त्वाचे आहे.
दुधोंडी गटात कॉँग्रेसचे नेते मानसिंग बॅँकेचे संस्थापक जे. के. (बापू) जाधव यांचे कार्यकर्ते अधिक आहेत. त्यामुळे उमेदवार निवडीवेळी कोणत्या गावाला उमेदवार द्यायचा, हे आधी निश्चित केले जाणार आहे. दुधोंडी ग्रामपंचायतीत शिवाजीराव मगर-पाटील, विजय आरबुने व शिवभवानी उद्योग समूहाचे संस्थापक शिवाजीराजे जाधव यांनी एकत्रित लढून सत्ता मिळविली होती. यावेळी मात्र ते एकत्रित लढतील, हे शक्य नाही. त्यामुळे जाधव व आरबुने यांच्याकडे कॉँग्रेस चाचपणी करेल. दुधोंडी हे सर्वांत मोठे व निर्णायक गाव आहे. त्यामुळे या गावाकडे नेत्यांचा कल जास्त असेल.
या मतदारसंघात दुधोंडी, दह्यारी, तुपारी, पुणदी, पुणदीवाडी, नागराळे, रामानंदनगर, सावंतपूर या गावांचा समावेश आहे. पूर्वीचे बुर्ली गाव वगळण्यात आले आहे व सावंतपूर या गावाचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. बुर्ली हे मोठ्या मताधिक्याचे गाव वगळल्याने कॉँग्रेसच्या मताधिक्यावर जास्त परिणाम होईल, असे बोलले जात आहे. कॉँग्रेसचे नेते आ. डॉ. पतंगराव कदम, आ. मोहनराव कदम, विश्वजित कदम, महेंद्र लाड, जे. के. (बापू) जाधव, शिवाजीराजे जाधव, हेमंत पाटील, संजय पाटील आदी नेते उमेदवार निश्चितीसाठी प्रयत्नशील आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आ. पृथ्वीराज देशमुख, संग्रामसिंह देशमुख, शिवाजीराव मगर-पाटील, राजाभाऊ पाटील, संदीप पाटील (घोगाव), मिलिंद पाटील, गुंडा पाटील आदी नेते, तर राष्ट्रवादीतर्फे ‘क्रांती’चे अध्यक्ष अरुण लाड, शरद लाड, किरण लाड, विनायक महाडिक आदी नेते उमेदवारी निश्चितीसाठी प्रयत्नशील आहेत.