शिराळा तालुक्यातील डोंगरदऱ्यात ‘डोंगरची काळी मैना’ फुलू लागली
By संतोष भिसे | Published: March 3, 2024 04:19 PM2024-03-03T16:19:57+5:302024-03-03T16:22:27+5:30
हिरव्यागार डोंगराची काळी मैना आता हिरवीगार दिसू लागली आहे. या एप्रिल व मे महिन्याच्या सुरुवातीला ही मैना पिकायला सुरुवात होते.
शिराळा : शिराळा तालुक्यातील डोंगरदऱ्यात ‘डोंगरांची काळी मैना’ म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे, तोरणे तसेच अळू, जांभूळ, काजू, डोंबले, आंबा आदी पूर्णपणे मोठ्या प्रमाणात बहरायला सुरुवात झाली आहे. या छोट्या काटेरी हिरव्यागार काळ्याभोर मैनेच्या सुरुवातीची हिरवीगार जाळ्याच्या जाळ्या गच्च भरल्या असून त्या जणू लक्ष वेधून घेत आहेत.
हिरव्यागार डोंगराची काळी मैना आता हिरवीगार दिसू लागली आहे. या एप्रिल व मे महिन्याच्या सुरुवातीला ही मैना पिकायला सुरुवात होते. या ही वर्षी डोंगरदरीत असलेल्या गावामध्ये ही मैना फुलायला लागली आहे. डोंगराच्या आसपास असलेल्या गावातील लोक सुटीच्या काळात आल्यानंतर न चुकता डोंगराच्या मैनेचा आस्वाद घेत असतात. दोन वर्षांपूर्वी वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात या रानमेव्याकडे दुर्लक्ष झाले. मात्र आता काळ्या मैनेचा आस्वाद घेत हा हंगाम पार पडेल.
घनदाट जंगलात ही मैना बहरली आहे . तसेच जैवविविधतेने नटलेल्या या डोंगर भागाला विविध प्रकारच्या संजीवनी लाभलेली आहे. या डोंगरावर प्रथम दर्शन या मैनेचे होते. सध्या डोंगराच्या कुशीत काटेरी जाळ्यात करवंदे बहरली आहे. वसंत व ग्रीष्मातील दाहकतेत पाहताच क्षणी तोंडला पाणी सुटेल इतका चविष्ट आंबट, गोड, रानमेवा जिभेवर ठेवताच तासभर त्या रानमेव्याच्या विशिष्ट चवीची आठवण उन्हाळ्यात होत राहते.
एप्रिल, मे महिन्यात मोठ्या प्रमाणात पश्चिम भागातून मोठ्या प्रमाणात महिला, पुरुष मंडळी डोंगराची मैना घ्या, करवंदे घ्या, जांभळे घ्या, डोंबले घ्या आदी ओरडत गल्लीबोळातून विक्रीसाठी येतात. शिराळा, वाळवा तालुक्यातील गावोगावी फिरून विक्री करतात.