‘एफआरपी’साठी काळी गुढी
By Admin | Published: April 8, 2016 11:34 PM2016-04-08T23:34:37+5:302016-04-09T00:06:01+5:30
शासनाचा निषेध : शेकापचे तहसीलसमोर आंदोलन
कडेगाव : उसाच्या एफआरपीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने शासनाचा निषेध करून कडेगाव तहसील कार्यालयासमोर काळी गुढी उभारण्यात आली. यावेळी शेकापचे सरचिटणीस अॅड. सुभाष पाटील व कार्यकर्त्यांनी शासनाविरुद्ध तीव्र शब्दात संताप व्यक्त केला.
साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे एकरकमी ऊस बिलाची रक्कम दिलेली नाही. ८० टक्के पहिला हप्ता दिला आहे आणि अद्याप उर्वरित २० टक्के हप्ता देण्यात आलेला नाही. शासनच केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबत उदासीन आहे. याशिवाय कडेगाव तालुक्यातील ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी असणारी १७ गावे अद्याप टंचाईग्रस्त गावांच्या यादीत समाविष्ट केलेली नाहीत.
साखरेचे दर उतरले म्हणून एफआरपी देण्यास टाळाटाळ करणारे कारखानदार आता साखरेचे दर वाढल्यावर तरी कुठे आनंदाने एफआरपी देत आहेत? २० टक्के उर्वरित ऊस बिल तातडीने मिळाले पाहिजे, याशिवाय कडेगाव तालुक्यातील दुष्काळग्रस्तांच्या यादीत समाविष्ट नसलेली १७ गावे तात्काळ समाविष्ट करावीत, अन्यथा शासनाविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेकापने निवेदनातून दिला आहे. याबाबतचे निवेदन निवासी नायब तहसीलदार भिसे यांना देण्यात आले. या आंदोलनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यासाठी संपूर्ण राज्यभर संघटना उभारण्यात येईल, असा इशाराही यावेळी वक्त्यांकडून देण्यात आला.
यावेळी अॅड. सुभाष पाटील, अॅड. नानासाहेब पाटील, इंद्रजित पाटील, सागर पाटील, परशुराम माळी, जोतिराम मोरे, विक्रम मोरे, सरपंच संजय मोरे, जयराम मोरे, गोरख महाडिक, नारायण वाघमोडे, श्रीरंग यादव यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी आदींसह शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)