काळ्या खणीची फाईल गहाळ
By admin | Published: June 22, 2015 11:58 PM2015-06-22T23:58:35+5:302015-06-22T23:58:35+5:30
फेरप्रस्तावाची तयारी : केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचे पत्र
सांगली : केंद्रीय तलाव संवर्धन योजनेअंतर्गत महापालिकेने महाआघाडीच्या सत्ताकाळात सादर केलेली काळी खण सुशोभिकरणाची फाईल केंद्रीय पर्यावरण मंत्रालयातून गहाळ झाली आहे. पर्यावरण मंत्रालयाने याबाबत महापालिकेला पत्र पाठविले असून, योजनेअंतर्गत पुन्हा प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली आहे. महाआघाडी सत्तेवर असताना याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे पाठविण्यात आला होता. शहरातील पुष्पराज चौकाजवळ सुमारे १० हेक्टर क्षेत्रात काळी खण असून या तलावाचे संवर्धन करण्यासाठी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय तलाव संवर्धन विभागाकडे सुरुवातीला २२ कोटींचा प्रकल्प अहवाल सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला केंद्राने प्राथमिक मान्यताही दिली, पण न्यायालयीन वादामुळे महापालिकेला निधी प्राप्त होऊ शकला नाही. त्या प्रकल्पाचे २७ कोटींचे दुरूस्ती अंदाजपत्रक केंद्राला सादर झाले. या प्रस्तावाला राज्याच्या पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिली होती. केंद्रातील सरकार बदलल्यानंतर महापालिकेने या प्रकल्पाबाबत स्मरणपत्र पाठविले होते.
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचे एक पत्र महापालिकेत सोमवारी आल्यानंतर महापालिकेला धक्का बसला. मंत्रालयातील काळ््या खणीची फाईलच हरविल्याचा उल्लेख या पत्रात होता. महापालिकेला फेरप्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिल्याने आता कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी धावाधाव सुरू झाली आहे. मंत्रालयातील फाईल गहाळ झाल्याने आता पुन्हा या फायलीचा प्रवास मंजुरीच्या सर्व टप्प्यांमधून होणार आहे. (प्रतिनिधी)
विघ्न संपता संपेना!
गेल्या दहा वर्षांपासून काळी खण सुशोभिकरणासाठी धडपड सुरू आहे. पण सातत्याने या प्रयत्नांत विविध कारणांनी अडथळे आले. काळी खण सुशोभिकरणाची ही विघ्नमालिका आजअखेर कायम आहे. काँग्रेसच्या सत्ताकाळात काळी खण सुशोभिकरणाची चर्चा सुरू झाली. त्याकाळी विरोधी संभाजी पवार गटाने या प्रस्तावावर उपहासात्मक टीका केली होती. त्यानंतर काळ्या खणीची जागा नेमकी कोणाची, यावरून वाद सुरू झाले. महापालिका आणि गणपती पंचायतन यांच्यात न्यायालयीन वाद होता. त्यामुळे केंद्राकडे गेलेला प्रस्ताव त्यावेळी नामंजूर झाला होता.