पावसाळी पाण्यावर काळ्या खणीचा मंत्र
By admin | Published: July 14, 2016 12:22 AM2016-07-14T00:22:48+5:302016-07-14T00:22:48+5:30
प्रस्ताव धूळ खात : प्रमोद चौगुलेंचा आराखडा
सांगली : पावसाळी पाणी निचरा होत नसल्याने सांगली शहराचे जनजीवन गेल्या चार दिवसांपासून विस्कळीत झाले आहे. तात्पुरत्या उपाययोजना आणि प्रशासकीय हतबलतेमुळे दरवर्षी या प्रश्नाचे स्वरूप अधिक गंभीर होत आहे. काही वर्षांपूर्वी सांगलीचे वास्तुविशारद प्रमोद चौगुले यांनी पाणी निचऱ्यावर काळ्या खणीचा मंत्र सांगणारा आराखडा सादर केला होता. या आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी आता पावले उचलणे गरजेचे आहे.
सांगली शहरातील ९० टक्के भाग सध्या जलमय बनला आहे. शहरातील रस्ते, खुले भूखंड, क्रीडांगणे, प्लॉट अशा सर्वच ठिकाणी तलाव साचले आहेत. याशिवाय पाणी साचून राहिल्याने शहरातील वाहतूक व्यवस्था गेल्या चार दिवसांपासून विस्कळीत झाली आहे. ड्रेनेजचे पाणीही रस्त्यांवर येत असल्याने आरोग्याचा प्रश्नही निर्माण होत आहे. दरवर्षी मान्सूनपूर्व गटारी, नालेसफाईची मोहीम आणि पाणी साचल्यानंतर विविध भागांची पाहणी करण्याची औपचारिकता यातच महापालिका, त्याठिकाणचे पदाधिकारी आणि नगरसेवक धन्यता मानत आहेत. कायमस्वरुपी उपाययोजनेच्या दृष्टीने कुणीच पावले उचलताना दिसत नाहीत.
सांगलीचे प्रमोद चौगुले यांनी दिलेल्या पावसाळी पाणी निचऱ्याचा प्रकल्प सहज शक्य असताना त्याकडे आजवर कुणीही पाहिले नाही. नकारात्मक भूमिकेतून प्रत्येक योजनेकडे आणि प्रकल्पाकडे पाहिल्याने सांगली राज्याला कोणताही आदर्श देऊ शकत नाही. मिरजेच्या हैदरखान विहिरीने केलेली क्रांती सांगलीच्या काळ्या खणीतूनही साकारली जाऊ शकते, मात्र त्याकडे गांभीर्याने कुणीही पाहिलेले नाही. सांगलीच्या काळ्या खणीतील पाण्याची पातळी कधीही कमी-जास्त होताना दिसत नाही. नैसर्गिक झऱ्यांनी युक्त असलेली ही काळी खण १७ एकर इतकी मोठी आहे. याठिकाणी केवळ पावसाळी पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा जोडली, तर सांगलीच्या गावठाणातील महत्त्वाच्या चौकांमधील आणि रस्त्यांवरील पाणी साठण्याचा प्रश्न सुटू शकतो. (प्रतिनिधी)