‘स्वाभिमानी’कडून मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे
By Admin | Published: May 19, 2017 11:41 PM2017-05-19T23:41:01+5:302017-05-19T23:41:01+5:30
‘स्वाभिमानी’कडून मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कर्जमुक्तीसह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्यानिमित्ताने आक्रमक झाले. पोलिसांच्या सुरक्षेचे कवच तोडून कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून सरकारचा निषेध केला. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलिसांची पळापळ झाली. काळे झेंडे दाखविणाऱ्या चार कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मुख्य कार्यकर्ते सकाळपासून नजरकैदेत ठेवूनही हे आंदोलन झाले. संजय बेले, अभिजित पाटील, वैभव चौगुले (तिघे रा. समडोळी) व महावीर पाटील (नांद्रे, ता. मिरज) अशी अटक केलेल्या कार्यकर्त्यांची नावे आहेत. त्यांना सोडून देण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी सांगली दौऱ्यावर होते. सांगली-मिरज रस्त्यावरील विजयनगर येथील नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्घाटन फडणवीस यांच्याहस्ते होणार होते. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी, उसाला हमीभाव मिळावा, या मागण्यांसाठी ‘स्वाभिमानी शेतकरी’सह अनेक संघटनांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार असल्याचा इशारा दिला होता. हा दौरा शांततेत पार पडावा, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांची दोन दिवसांपासून पळापळ सुरू होती. आंदोलनाच्या पवित्र्यात असणाऱ्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटिसा बजावून, कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला होता.
शुक्रवारी सकाळपासून विलिंग्डन महाविद्यालय ते विजयनगरच्या नूतन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. विजयनगरकडे येणाऱ्या लहान-मोठ्या कच्च्या रस्त्यांवरही पोलिस बंदोबस्त होता. वरिष्ठ अधिकारी परिसरात लक्ष ठेवून होते. मुख्यमंत्री फडणवीस दुपारी साडेबाराच्या सुमारास विजयनगर येथे आले. तेथील कार्यालयाचे उद्घाटन करून ते इमारतीच्या आत गेले. तेथून ते काही वेळातच बाहेर आले. कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ येताच स्वाभिमानीचे शेतकरी संघटनेचे संजय बेले, अभिजित पाटील, वैभव चौगुले, महावीर पाटील अचानक पोलिसांच्या सुरक्षेचे कवच तोडून फडणवीस यांच्यासमोर आले आणि त्यांनी काळे झेंडे दाखवून सरकारचा निषेध केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची पळापळ झाली. त्यांनी या चौघांना ताब्यात घेऊन पोलिस गाडीत घालून तेथून हलविले. हा प्रकार पाहून फडणवीस तातडीने मोटारीत बसून पुढील दौऱ्यासाठी मिरजेला रवाना झाले.
महेश खराडेंसह सातजण नजरकैदेत
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते महेश खराडे, जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, भास्कर कदम, शहाजी पाटील, आप्पासाहेब पाटील, मधुकर डिस्ले, भागवत जाधव या सातजणांना पोलिसांनी शुक्रवारी दिवसभर नजरकैदेत ठेवले होते. खराडे यांना विश्रामबाग पोलिसांनी सांगलीत ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना तासगाव पोलिस ठाण्यात बसविण्यात आले होते. अन्य सहा कार्यकर्त्यांना इस्लामपूर व शिराळा पोलिस ठाण्यात बसविले होते. सायंकाळी मुख्यमंत्री सांगली जिल्ह्यातून रवाना झाल्यानंतरच त्यांना सोडण्यात आले.