पोटठेके देणाऱ्या सोसायट्यांना काळ्या यादीत टाकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:40 AM2020-12-16T04:40:33+5:302020-12-16T04:40:33+5:30
सांगली : जिल्हा परिषदेची कामे मिळवून ती पोटठेक्याने देणाऱ्या मजूर सोसायट्यांना काळ्या यादीत टाकण्याचा इशारा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ...
सांगली : जिल्हा परिषदेची कामे मिळवून ती पोटठेक्याने देणाऱ्या मजूर सोसायट्यांना काळ्या यादीत टाकण्याचा इशारा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी दिला. जिल्हा परिषद मुख्यालयाच्या दुरुस्ती कामांत अनियमितता करणाऱ्या आरगच्या सिद्धनाथ व लिंगनुरातील गणेश या सोसायट्यांची मान्यता रद्द करण्याची शिफारस सहकार विभागाकडे करणार असल्याचेही ते म्हणाले.
मुख्यालय इमारतीच्या फरशी, रंगरंगोटी, स्वच्छतागृहांच्या दुरुस्ती कामात अनेक घोटाळे व अनियमितता असल्याचे चौकशीत आढळले आहे. ही कामे सिद्धनाथ व गणेश सोसायट्यांनी घेतली होती. त्यासाठी त्यांनी पोटठेके दिल्याचेही निष्पन्न झाले आहे. याची गंभीर दखल गुडेवार यांनी घेतली आहे.
ते म्हणाले की, मजुरांना रोजगार मिळावा या हेतूने सोसायट्यांना कामे दिली जातात. प्रत्यक्षात या कामावर एकही मजूर नसल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. सोसायटीच्या संचालकांच्या नातेवाईकांनाच मजूर म्हणून दाखविले जाते. गणेश व सिद्धनाथ सोसायट्यांनीही असाच प्रकार केला आहे. त्यामुळे त्यांची मान्यता रद्द करण्याची शिफारस सहकार विभागाकडे करणार आहोत.
गुडेवार म्हणाले की, मजूर सोसायट्यांनी पोटठेकेदार नेमून कामे केल्याचे आढळल्यास त्यांना काळ्या यादीत टाकले जाईल. यासाठी प्रत्येक कामाची काटेकोर चौकशी केली जाईल. दरम्यान, मजूर सोसायट्यांच्या नावाखाली सर्रास नेतेमंडळीच ठेके घेत असल्याचे वेळोवेळी आढळले आहे. निविदा मिळवायची आणि पाच टक्के कमिशनवर दुसऱ्या ठेकेदाराला द्यायची. या प्रक्रियेत प्रत्यक्ष काम न करताही लाखो रुपये मिळविले जातात. हा प्रकार चालू देणार नसल्याचे गुडेवार म्हणाले.
----------