सांगलीत गॅस सिलेंडरचा स्फाेट; चार घरे जळून खाक; अग्निशमन दलाचे चार कर्मचारी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 07:54 PM2022-02-18T19:54:04+5:302022-02-18T19:57:33+5:30
आगीच्या झळा लागल्याने अग्निशमन दलातील चार कर्मचारी जखमी
सांगली : शहरातील पंचशीलनगर परिसरात गॅस सिलेंडरच्या झालेल्या स्फोटात चार घरे जळून खाक झाली. आगीची माहिती मिळताच आग विझविण्यासाठी दाखल झालेल्या महापालिकेच्या अग्निशमन दलातील चार कर्मचारी आगीच्या झळा लागल्याने जखमी झाले. शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास हा प्रकार घडला. या परिसरातील घरात कोणीही नागरिक नसल्याने जिवीतहानी टळली. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग विझविण्यात यश आले.
पंचशिलनगर येथील शांतिनिकेतन लोकविद्यापीठा शेजारी मेंडगुळे वस्ती आहे. या परिसरात रेल्वे मार्गाजवळच असलेल्या खुल्या जागेवर झोपडपट्टी आहेत. शुक्रवारी दुपारच्या सुमारास यातील नंदकुमार जावीर यांच्या घरात गॅसची गळती होऊन शॉर्ट सर्कीट होऊन आग लागली.
आग वाढतच चालल्याचा प्रकार नागरिकांच्या लक्षात येताच, त्यांनी तात्काळ अग्निशमन दलास याची माहिती दिली. त्यानंतर तातडीने अग्निशमन दलाचे चार बंब, रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या चार घरात आठ सिलेंडर होते. अग्निशमनच्या जवानांनी तातडीने ऑपरेशन राबवत हे सिलेंडर सुरक्षितपणे बाहेर काढले.
नेमके याचवेळी बंद असलेल्या नंदकुमार जावीर यांच्या घरातील सिलेंडरचा स्फोट झाला. आगीपाठोपाठ गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने उपस्थितांमध्ये धावपळ उडाली. या स्फोटात घराचा पत्रा लांबवर फेकला गेला. अचानकच झालेल्या या स्फोटामुळे आग शमविण्यासाठी आघाडीवर असलेले जवान जखमी झाले. या आगीत संग्राम जावीर, नंदकुमार जावीर, दगडू चवरे आणि विजय पडळकर यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.