अंध मुलांनी अनुभवली संगणकाची दुनिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:22 AM2021-01-15T04:22:07+5:302021-01-15T04:22:07+5:30
अपंग सेवा केंद्रातील कार्यक्रमाचे उद्घाटन संतोष वीर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी यशवंत जाधव, सुनील राठोड उपस्थित होते. लाेकमत न्यूज ...
अपंग सेवा केंद्रातील कार्यक्रमाचे उद्घाटन संतोष वीर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी यशवंत जाधव, सुनील राठोड उपस्थित होते.
लाेकमत न्यूज नेटवर्क
सांगली : संगणकांची दुनिया, ऑडिओ बुकचे माहितीजाल यांचा अनुभव घेत सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्यातील ४० अंध, दिव्यांग मुला-मुलींनी सांगलीतील प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घेतला. सामान्य लोकांप्रमाणे अंध, दिव्यांग मुलांनाही आधुनिक तंत्रज्ञानाचे विश्व खुले असल्याचे मत विविध मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले.
सांगलीतील अपंग सेवा संस्था व सर्वधर्मसमभाव अपंग सेवा संस्था मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने लुई ब्रेल यांच्या जयंतीनिमित्त अंध मुलांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे अधीक्षक संतोष वीर यांनी ‘मीसुद्धा सम्राट होऊ शकतो’ या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान दिले. त्यानंतर दुसऱ्या सत्रात पुणे अंध शाळेतील प्रशिक्षक तेजस बेंद्रे यांनी संगणक, अँड्राॅईड मोबाईल व अन्य आधुनिक साधनांचा परिचय मुलांना करून दिला. लुई ब्रेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. स्वागत व प्रास्ताविक अपंग सेवा संस्थेच्या अध्यक्षा निर्मला कुलकर्णी यांनी केले.
तंत्रज्ञान शिकण्यासाठी स्थानिक अंध युवक, युवतींना पुणे, मुंबईला जावे लागत असल्याने, सांगलीतील संस्थेतच आता संगणक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू होत आहे. लवकरच अंध मुलांना स्पर्धा परीक्षांची तयारी करता यावी, म्हणून ऑडिओ बुक लायब्ररीही सुरू करीत आहोत, अशी माहिती यशवंत जाधव यांनी दिली.