Sangli: आंधळीत मजुराचे अपहरण करून मारहाण, सात ते आठ जणांविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 05:16 PM2024-05-31T17:16:40+5:302024-05-31T17:17:34+5:30
पलूस : आंधळी (ता. पलूस) येथे एका मजुराचे अपहरण करून कमरेच्या पट्ट्याने जबर मारहाण करून त्यास गंभीर जखमी केले. ...
पलूस : आंधळी (ता. पलूस) येथे एका मजुराचे अपहरण करून कमरेच्या पट्ट्याने जबर मारहाण करून त्यास गंभीर जखमी केले. याबाबत उमर कलिंदर पठाण (वय २६, रा. आंधळी) याने पलूस पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संशयित सोहेल आलम मुल्ला, टिणू ऊर्फ ऋषिकेश मगदूम (रा. आंधळी) या दोघांसह अनोळखी सात ते आठ जणांविरुद्ध अपहरणासह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी उमर पठाण हा गवड्यांच्या हाताखाली मजुरीचे काम करतो. मंगळवारी, दि.२८ रोजी दुपारी जेवणाची सुटी झाल्यानंतर उमर हा जेवण करण्यासाठी घराकडे चालत जात असताना त्याला संशयितांनी रस्त्यात अडवले. सोहेल आलम मुल्ला व अनोळखी यांनी जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून त्याला टिनू ऊर्फ ऋषिकेश मगदूम याच्या आंधळी येथील शेतातील पोल्ट्री शेडवर आणले. सोहेल मुल्ला, टीनू ऊर्फ ऋषिकेश मगदूम यांनी कमरेच्या पट्ट्याने उमरला जबर मारहाण केली. इतर ७ ते ८ जणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली, तसेच जिवे मारण्याची धमकी दिली.
याबाबत उमर पठाण यांच्या फिर्यादीवरून नऊ ते दहा जणांवर अपहरणासह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील सर्व संशयित फरारी आहेत. त्यांच्या शोधासाठी पलूस पोलिसांनी तीन पथके तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केली आहेत, तर जखमी उमर याला पलूस येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.