Sangli: नियतीने डोळे हिरावले, पण हार नाही मानली; अस्वलेवाडीतील प्रज्ञा बारावीच्या परीक्षेत शाळेत पहिली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 06:23 PM2024-05-23T18:23:24+5:302024-05-23T18:23:33+5:30
दृष्टी परत मिळविण्यासाठी पालकांची पराकाष्ठा
बाबासाहेब परीट
बिळाशी : पाचवीपर्यंत हसण्या-बागडण्याचं.. फुलपाखरू होऊन स्वच्छंदी फिरण्याचे वय आणि याच वयात अस्वलेवाडी (ता. शिराळा) येथील प्रज्ञा सुरेश जाधव या मुलीचे डोळेच गेले. डोळ्यांसमोर अंधार आणि आयुष्यातही अंधार पसरला.. पण या अंधाराच्या पलीकडेही आपल्यासाठी पहाट असते याची जाणीव झालेल्या प्रज्ञाने बारावीच्या परीक्षेत ७७.१७ टक्के गुणांसह काेकरूड (ता. शिराळा) येथील कन्या शाळेत पहिला क्रमांक पटकावला.
लहान वयातच डाेळे गेले तरीही धडपडुन शिक्षण घेणाऱ्या प्रज्ञाला दहावीला ६० टक्के गुण मिळाले. ते खूपच कमी आहेत अशी टोचणी तिला लागली. तिने ठरवले की आपण खूप मेहनत करायची. अभ्यासासाठी प्रज्ञा पहाटे चारला उठायची. पुस्तकांची वानवा.. ब्रेललिपी येत नव्हती. यादरम्यान मंगरूळ येथील दिव्यांग अभय कुंभार यांनी तिला ऑडिओ बुक्सबद्दल माहिती दिली.
बघता-बघता विविध विषयांवरील बुक्स उपलब्ध झाली. पहाटेपासून शांतपणे ऐकत राहायचे... युट्युबवरील अनेक व्हिडिओ ऐकायचे.. आई-वडील भावाच्या मदतीने हे सगळं करायचं. पण हार मानायची नाही.. मोबाईल नव्हता म्हणून मामाने मोबाईल घेऊन दिला.. मोबाईलचा योग्य वापर करून प्रज्ञाने प्रचंड मेहनत घेतली. बारावीच्या परीक्षेत ती कोकरूडच्या कन्या शाळेत पहिली आली आहे.
खरंतर हे तिचे यश सामान्य नाहीच. सर्व सुखसोयी उपलब्ध असताना शरीर धडधाकट असतानाही अनेक मुले जिद्दीअभावी मागे पडतात. पण डोळे नसतानाही प्रज्ञाने मेहनतीने संपादन केलेले यश निश्चितच प्रेरक आहे.
दृष्टी परत मिळविण्यासाठी पालकांची पराकाष्ठा
सहावीत शिकत असताना प्रज्ञाची दृष्टी गेली. तिचे डोळे परत यावेत म्हणून हमाली करणारे वडील सुरेश जाधव आणि घरकाम करणारी आई तसेच तिच्या मामाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. अगदी हैदराबादपर्यंत तिला नेण्यात आले पण यश आले नाही.