शेतीपूरक उद्याेग, कृषिसेवा केंद्रे बंदमुळे शेतकऱ्यांची नाकाबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:25 AM2021-05-16T04:25:47+5:302021-05-16T04:25:47+5:30
मातीत खत घातल्याशिवाय पीक येत नाही. जनावरांना भरड घातल्याशिवाय दूध निघत नाही. सामान्य जनता नुसत्या मेडिकलच्या गोळ्या खाऊन जगू ...
मातीत खत घातल्याशिवाय पीक येत नाही. जनावरांना भरड घातल्याशिवाय दूध निघत नाही. सामान्य जनता नुसत्या मेडिकलच्या गोळ्या खाऊन जगू शकत नाही. त्यांनाही किराणा तेल मीठ लागतेच, पंधरा दिवस पुरेल इतका किराणा साठा करून ठेवण्याची सामान्य अनेकांची आर्थिक कुवतही नाही, पण मायबाप सरकारला हे सांगणार काेण, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.
रोजंदारी नसल्याने रुपया-दोन रुपयांनाही सामान्य माणसं महाग झाली आहेत. आधी गरिबाच्या पोटाचा प्रश्न मिटवा. मग लाॅकडाऊन वाढवा, अशी मागणी सामान्य नागरिकांतून होत आहे.
लाॅकडाऊनमुळे लाखो रुपयांचा माल व्यापाऱ्यांजवळ पडून आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांचे मोठे नुकसान होत आहे. प्रशासनाने कोणाचीही कदर न करता, लाॅकडाऊन वाढविण्याचा सपाटा लावला आहे. सोनहिरा परिसरात जिल्हा लाॅकडाऊनच्या आधीच पाच दिवसांपासून लाॅकडाऊन चालू आहे. त्यामुळे गाेरगरीब जनता मेटाकुटीला आली आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस शेती आहे. पावसाळ्यापूर्वी लागवडी घालून ऊस कुळवायचा असतो. मात्र, कृषी दुकाने बंद असल्याने शेतकऱ्याची कामे खोळंबली आहेत, तसेच शेती पुरक दुकाने हार्डवेअर, पशुखाद्य विक्री, अवजारांची दुकाने बंद असल्याने शेती व शेतीच्या कामांना ब्रेक लागला आहे. शेतीची मेहनत घात बघून करावी लागते. यामुळे शेतीपूरक व्यवसायांची दुकाने खुली करणे गरजेचे आहे.