रक्तपेढ्यांनी अधिक सतर्क रहावे
By admin | Published: July 3, 2016 12:15 AM2016-07-03T00:15:37+5:302016-07-03T00:15:37+5:30
अनिल मडके : ‘लोकमत’तर्फे सांगलीत रक्तदान शिबिर उत्साहात
सांगली : विविध क्षेत्रात आलेली व्यावसायिकता, भेसळीचे प्रकार रक्तदानाच्या चळवळीलाही स्पर्श करू पाहात आहेत. त्यामुळे रक्त पेढ्यांमधील सामाजिकता टिकविण्याचे आव्हान आता निर्माण झाले आहे. त्यासाठी अशी सामाजिकता जोपासणाऱ्या रक्तपेढ्यांनी अधिक सतर्क रहायला हवे, असे मत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सांगली शाखेचे अध्यक्ष डॉ. अनिल मडके यांनी व्यक्त केले.
‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त येथील डॉ. शिरगावकर रक्तपेढीत रक्तदान शिबिर पार पडले. अनेक रक्तदात्यांनी यात सहभाग घेतला. शिबिराचे उद्घाटन मडके यांच्याहस्ते जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी शिरगावकर रक्तपेढीचे सचिव उज्वल तिळवे, डॉ. सुभाष रुपनर, जनसंपर्क अधिकारी अरुणा साखवळकर आदी उपस्थित होते.
मडके म्हणाले, रक्तपेढ्यांमधील डॉक्टर व कर्मचारी सामाजिकतेचे भान ठेवून काम करीत असतात. मात्र व्यावसायिकता डोळ््यासमोर ठेवून काही प्रवृत्ती या चळवळीसमोर अनेक अडचणी निर्माण करीत आहेत. अशावेळी रक्तपेढ्यांमधील कर्मचाऱ्यांनी सतर्कतेने काम केले पाहिजे. एखादी छोटी चूकही एखाद्या रुग्णाचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. खाद्यपदार्थांपासून अनेक अवयवांपर्यंत कृत्रिमतेचा प्रवेश झाला. कृत्रिम गोष्टींची निर्मिती होत असताना अद्याप रक्ताच्या बाबतीत अशी कृत्रिमता आलेली नाही. केवळ रक्तदानच नव्हे, तर आता रक्तघटकांचे दानही महत्त्वाचे बनले आहे. त्यादृष्टीनेही जागृती झाली पाहिजे. अनेकदा एकाचवेळी रक्ताचे मोठ्या प्रमाणावर दान होते, तर एखाद्यावेळी तुटवडा निर्माण होतो. रक्ताचा तुटवडा कधी निर्माण होऊ नये, तसेच दुर्मिळ रक्तदात्यांची यादी तयार करून त्यानुसार रुग्णांना मदत करणारी यंत्रणा उभी रहावी, असे ते म्हणाले.
अरुणा साखवळकर म्हणाल्या की, रक्तपेढ्यांबद्दल लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. बऱ्याचदा त्यांनी रक्तदान केल्यानंतर पेढ्यांकडून अनेक प्रकारच्या अपेक्षा बाळगतात. त्या पूर्ण झाल्या नाहीत, तर रक्तपेढ्यांना दोष दिला जातो. वास्तविक रक्तपेढ्यांच्याही बऱ्याच अडचणी आहेत. त्या लोकांनी समजून घेतल्या पाहिजेत. (प्रतिनिधी)