रक्ताचा रिपोर्ट हाताने अन् एक्स-रे मोबाईलवर; शासकीय रुग्णालयातील अजब कारभार
By अविनाश कोळी | Published: October 31, 2022 04:06 PM2022-10-31T16:06:04+5:302022-10-31T16:06:14+5:30
ईसीजी, एक्स-रेचे निरीक्षण हाताने नोंदवायचे अन् डॉक्टरांच्या स्वाक्षऱ्यांसाठी कित्येक तास रांगेत ताटकळत थांबायचे, असे प्रकार सध्या राज्यातील प्रत्येक शासकीय रुग्णालयात सुरू आहेत
अविनाश कोळी
सांगली: केसपेपरच्या चिटकोऱ्यावर संपूर्ण रक्ताचा अहवाल लिहायचा... ईसीजी, एक्स-रेचे निरीक्षण हाताने नोंदवायचे अन् डॉक्टरांच्या स्वाक्षऱ्यांसाठी कित्येक तास रांगेत ताटकळत थांबायचे, असे प्रकार सध्या राज्यातील प्रत्येक शासकीय रुग्णालयात सुरू आहेत. चार महिन्यांपासून ही रुग्णालये ऑफलाइन झाल्याने राज्यभर रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे हाल सुरू आहेत.
डिजिटल इंडिया अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व शासकीय रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालये ऑनलाइन कारभार करत असताना जुलै २०२२मध्ये एका रात्रीत अचानक संबंधित एजन्सीला काम बंद करण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले होते. तेव्हापासून गेले चार महिने रुग्णालयातील कामकाज ऑफलाइन झाल्याने केस पेपरपासून विविध वैद्यकीय अहवालही हाताने लिहून देण्याची वेळ डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर आली आहे.
आरोग्य व्यवस्थापन व माहिती प्रणाली (एचएमआयएस)ची अंमलबजावणी राज्यात अनेक वर्षांपासून सुरू होती. एका खासगी एजन्सीमार्फत त्याचे काम केले जात होते. केसपेपरपासून विविध वैद्यकीय चाचण्या, अहवाल ऑनलाइन करण्यात आले होते. त्यामुळे रुग्णसेवा गतिमान झाली होती. रुग्णांना रांगेत फार काळ ताटकळत बसावे लागत नव्हते. मात्र, अचानक आरोग्य विभागाने ही प्रणाली बंद केली. त्याचे कारण कोणत्याही रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना माहीत झाले नाही. संगणकीय प्रणाली बंद करून त्यावरील कंत्राटी कर्मचारी चार महिन्यांपूर्वी निघून गेले. त्यामुळे गेले चार महिने हा गोंधळ व रुग्णांचे हाल सुरू आहेत.
जुन्या अहवालांचे काय?
या ऑनलाइन प्रणालीत राज्यभरातील शासकीय रुग्णालयातील लाखो रुग्णांचा डेटा, रुग्णालयातील माहिती, अहवाल, वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल, पत्रव्यवहार अशा सर्व गोष्टी अडकल्या आहेत. त्या परत मिळविणे कठीण झाले आहे.
या अडचणींमुळे रुग्ण हैराण
- राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांत रुग्णांचे वैद्यकीय अहवालही हाताने लिहावे लागताहेत.
- एक्स-रे, ईसीजीचे निरीक्षण डॉक्टरांना हातानेच नोंदवावे लागत आहे.
- ज्याठिकाणी एक्स-रे प्रिंटर बंद पडतो तिथे संगणकावरील चित्र मोबाइलवर घेऊन डॉक्टरांना दाखवावे लागते.
- जे अहवाल तासात मिळायचे त्यांना आता दोन ते तीन दिवसाचा अवधी लागत आहे.
- फिटनेस प्रमाणपत्रासाठी विद्यार्थी, शासकीय कर्मचारी यांना अनेक तास रांगेत थांबावे लागत आहे.