शिरसटवाडीच्या तरुणाचा खून
By admin | Published: November 3, 2016 11:59 PM2016-11-03T23:59:21+5:302016-11-03T23:59:21+5:30
महिलेसह चारजण ताब्यात : वाकुर्डे बुद्रुक येथे तलावात मृतदेह आढळला
शिराळा / येळापूर : वाकुर्डे बुद्रुक (ता. शिराळा) येथील बादेवाडी पाझर तलावात शंकर मारुती शिरसट (वय ४०, रा. शिरसटवाडी, ता. शिराळा) या युवकाचा मृतदेह आढळला असून, त्याचा मृत्यू डोक्यात धारदार शस्त्राने वार झाल्याने झाल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. याप्रकरणी महिलेसह चारजणांना कोकरूड पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
मृत शंकर मुंबईत नोकरीस होता. एक वर्षापासून तो गावाकडे आला होता. शनिवारी (दि. २९ आॅक्टोबर) सायंकाळी मित्राचा दूरध्वनी आला म्हणून मित्रांबरोबर जेवायला शेडगेवाडी येथे जात असल्याचे पत्नी शीतल हिला सांगून तो घराबाहेर पडला. मात्र, तो परत न आल्याने बुधवारी (दि. २ नोव्हेंबर) त्याचा भाऊ संजय यांने तो बेपत्ता असल्याची फिर्याद कोकरूड पोलिस ठाण्यात दिली होती. यादरम्यान शंकरचा भ्रमणध्वनी बंद असल्याचे आढळून आले. नातेवाइकांकडेही चौकशी केली. मात्र, त्याचा शोध लागला नव्हता.
गुरुवारी सकाळी अकरा वाजता बादेवाडी तलावात एक मृतदेह तरंगत असल्याचे शेतकऱ्यांनी पाहिल्यावर शिराळा पोलिस ठाण्यास कळविले. चौकशीनंतर हा मृतदेह शंकर शिरसटचा असल्याचे निष्पन्न झाले. बुधवारीच या तलावापासून एक किलोमीटरवर बेवारस स्थितीत मोटारसायकल (एमएच ०४ बीजे ४४६४) सापडली होती. या मोटारसायकलच्या मालकाचा शोध शिराळा पोलिस घेत होते. मात्र, गुरुवारी शंकरचा मृतदेह आढळल्यानंतर ही मोटारसायकलही शंकरचीच असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. विलास रावळ यांनी शवविच्छेदन केल्यावर शंकरच्या डोक्यात धारदार शस्त्रामुळे अथवा वस्तूमुळे जखम झाली असून, त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. व्हिसेरा राखून ठेवण्यात आला. शंकरचा खून करून त्याचा मृतदेह बादेवाडी तलावात टाकण्यात आला असावा, अशी तक्रार पत्नी शीतल शिरसट यांनी पोलिसात दिली आहे. कोकरूड आणि शिराळा पोलिस ठाण्यांकडून तपास सुरू आहे.
मृत शंकरच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे.
शवविच्छेदनानंतर पत्नी शीतल यांनी पतीचा खून झाला असून, खुनाचा गुन्हा दाखल करावा व खुन्यांना अटक करावी, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यानुसार पोलिस निरीक्षक प्रताप पोमण यांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.
अनैतिक संबंधाची चर्चा
शनिवारी (दि. २९ आॅक्टोबर) लक्ष्मी पूजनादिवशी मित्रांचे वारंवार दूरध्वनी येत होते. त्यामुळे शंकर जेवण करण्यास गेल्याचे पत्नीने सांगितले. बुधवारी (दि. २) शंकरची मोटारसायकल घटनास्थळापासून एक किलोमीटरवरील पडवळवाडीच्या रस्त्यावर आढळून आली. हा खून अनैतिक संबंधातून झाला असल्याची चर्चा होती.
महिलेसह चौघांवर संशय : कोकरूड पोलिसांत पत्नी शीतल हिने एका महिलेसह काही संशयास्पद व्यक्तींची नावे सांगितल्यावर चारजणांना ताब्यात घेतले आहे. शंकरवर जानेवारीमध्ये मारामारी व एप्रिल महिन्यात विनयभंगाचा गुन्हा कोकरूड पोलिस ठाण्यात नोंद आहे.