शिबिरांतील रक्ताच्या तपासणीतून ३९ जण एडसबाधित निष्पन्न, एचआयव्हीग्रस्तांची संख्या १० हजार ३४७
By संतोष भिसे | Published: January 2, 2023 06:25 PM2023-01-02T18:25:51+5:302023-01-02T18:26:03+5:30
रक्तदान शिबिरात संकलित झालेल्या रक्ताची शास्त्रीय तपासणी करुनच अन्य रुग्णांसाठी त्याचा वापर केला जातो.
सांगली : रक्तदान शिबिरात संकलित झालेल्या रक्ताची शास्त्रीय तपासणी करुनच अन्य रुग्णांसाठी त्याचा वापर केला जातो. अशा तपासण्यांदरम्यान जिल्ह्यात ३९ जण एचआयव्ही संक्रमित आढळले आहेत. एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. प्रभारी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप माने, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, कार्यक्रम अधिकारी डॉ. विवेक सावंत आदी उपस्थित होते.
डुडी म्हणाले, १८ रक्तपेढ्यांमधून वर्षभरात ३४ हजार ४६३ पिशव्या रक्ताचे संकलन झाले. ठिकठिकाणीची शिबिरे, तसेच पेढीतील दात्यांकडून रक्त मिळाले. या रक्ताची पेढीच्या प्रयोगशाळेत तपासणी केली असता, ३९ रक्तदाते संसर्गित आढळले. त्यातील सातजण एचआयव्ही पॅाझिटिव्ह आढळले आहेत. जिल्ह्यात सध्या १० हजार ३४७ एचआयव्हीग्रस्त आहेत. प्रत्येक महिन्याला एआरटी केंद्रातून उपचार घेत आहेत. शासनाच्या धोरणानुसार सर्व संसर्गित रूग्णांपर्यंत औषधोपचार पोहोचविण्याचे प्रयत्न आहेत. त्यांच्या कुटुंबियांचीही तपासणी केली जात आहे.
डुडी म्हणाले, काम कमी असलेल्या एआरटी केंद्रांना अधिकाऱ्यांनी भेटी द्याव्यात. एचआयव्हीचे संक्रमण जास्त असणारी ठिकाणे निश्चित करावीत. एचआयव्हीग्रस्तांचे व्यवसाय मॅपिंग करावे. त्यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून उपचार द्यावेत. शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा.