रक्ताचे नाते गोठले, स्मशानात साचलेल्या राखेचे करायचे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:29 AM2021-05-25T04:29:31+5:302021-05-25T04:29:31+5:30
सांगली : जिल्ह्यात कोरोनामुळे जवळपास तीन हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मिरज-पंढरपूर रस्त्यावरील स्मशानभूमीत कोविड मृतांवर अंत्यसंस्काराची व्यवस्था ...
सांगली : जिल्ह्यात कोरोनामुळे जवळपास तीन हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मिरज-पंढरपूर रस्त्यावरील स्मशानभूमीत कोविड मृतांवर अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्यात आली असली, तरी रक्षाविसर्जनासह अनेक धार्मिक विधीला प्रतिबंध आहे. कोरोनामुळे रक्तांची नाती गोठली असताना, अंत्यसंस्कारानंतर ही रक्षाविसर्जनाची जबाबदारी स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर आली आहे. ही राख एक खड्डा खणून त्यात टाकली जात आहे. या प्रकाराने हे कर्मचारीही गहिवरत आहेत.
जिल्ह्यात वर्षभरापासून कोरोनाने थैमान घातले आहे. आतापर्यंत ३१७२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी बहुतांश कोविड मृतांवर मिरज-पंढरपूर रस्त्यावरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यासाठी महापालिकेने मोफत अंत्यसंस्काराची व्यवस्था केली आहे. एप्रिलपासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. दररोज ४० हून अधिक रुग्णांचा मृत्यू होत आहे. या सर्वांवर अंत्यसंस्काराची जबाबदारी महापालिकेकडून पार पाडली जात आहे. त्यासाठी महापालिकेने ठेकाही दिला आहे.
मृतांवर अंत्यसंस्कारासाठी मोजक्याच लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी आहे. काही मृतांचे तर नातेवाईकही स्मशानभूमीकडे फिरकत नाहीत. काहीजण स्मशानभूमीपर्यंत येतात; पण अग्नी देण्यासाठी पुढे येत नाहीत. अशावेळी स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांवर अंत्यसंस्काराची जबाबदारी येते. अंत्यसंस्काराचे सोपस्कार पार पडल्यानंतर काहीजण रक्षा मागणी करतात; पण ती दिली जात नाही. सध्या महापालिकेकडून स्मशानभूमीच्या आवारातच खड्डा खणून त्या राखेची विल्हेवाट लावली जात आहेत. त्यामुळे अंत्यसंस्कार व रक्षाविसर्जन या दोन्ही जबाबदारी रक्ताच्या नात्यापलिकडील कर्मचाऱ्यांवर आली आहे.
चौकट
पंढरपूर रोड स्मशानभूमी
महापालिकेने मिरज-पंढरपूर रस्त्यावरील स्मशानभूमीत अंत्यसंस्काराची व्यवस्था केली आहे. त्यासाठी खासगी ठेका दिला आहे. दिवसभर कोविड मृतांवर अंत्यसंस्कार केले जातात. दुसऱ्यादिवशी सकाळी कर्मचाऱ्यांकडून सर्व राख एकत्र केली जाते. त्यानंतर ही राख जवळच्याच खड्ड्यात टाकून त्याची विल्हेवाट लावली जात आहे.
चौकट
स्मशानजोगींची पाठ
स्मशानभूमीतील राखेतून सोने शोधण्यासाठी स्मशानजोगींची धडपड इतरवेळी पाहायला मिळते; पण कोविड मृतांवरील अंत्यसंस्काराच्या स्मशानभूमीकडे मात्र स्मशानजोगींनी पाठ फिरविली आहे. काही लोकांनी ठेकेदाराच्या कर्मचाऱ्याला राखेत चाळण मारून सोन्याचा शोध घ्यावा, असे सांगितले होते; पण या कर्मचाऱ्यांनी त्याला नकार दिला आहे. सरसकट राख गोळा करून त्याची विल्हेवाट लावली जात आहे.
चौकट
मोजकेच लोक मागतात अस्थी
या स्मशानभूमीत गेल्या वर्षभरापासून कोविड मृतांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्यासाठी मोजकेच नातेवाईक उपस्थित असतात. काहींचे नातेवाईकही येत नाहीत. काहीजण अंत्यसंस्कारानंतर अस्थी देण्याची विनंती करतात; पण स्मशानभूमीतील कर्मचाऱ्याकडून त्याला स्पष्ट नकार दिला जातो. वास्तविक घरातील व्यक्तीच्या निधनानंतर रक्षाविसर्जनाचा विधीही करण्यास मिळू नये, अशी वेळ कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांवर आली आहे.
चौकट
अस्थींचे करायचे काय?
१. पंढरपूर रोडवरील स्मशानभूमीत दररोज २० हून अधिक कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्यासाठी खासगी ठेकेदार नियुक्त करण्यात आला आहे.
२. अंत्यसंस्कारानंतर कर्मचारी दररोज सकाळी राख एकत्रित गोळा करून स्मशानभूमीची स्वच्छता करतात. त्यानंतर ही राख खड्ड्यात टाकून विल्हेवाट लावली जाते.
३. महापालिकेकडून जेसीबीने सहा ते सात फुटाचा खड्डा खणून दिला जातो. हा खड्डा दोन ते तीन दिवसांत भरून जातो. पुन्हा राखेच्या विल्हेवाटीसाठी नवीन खड्डा काढला जातो.