सांगलीत टोळीयुद्धातून तरुणाचा खून-- भरदिवसा थरारनाट्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 09:19 PM2017-09-22T21:19:29+5:302017-09-22T21:20:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरात शुक्रवारी भरदिवसा टोळीयुद्धाचा भडका उडाला. पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुंड व सावंत टोळीचा सदस्य बाळू भोकरे व त्याच्या तीन साथीदारांवर सावंत प्लॉट परिसरातील प्रतिस्पर्धी टोळीने धारदार शस्त्राने हल्ला चढवला. या हल्ल्यात भोकरेचा साथीदार शकील सरदार मकानदार (वय ३४, रा. साई मंदिरजवळ, शंभरफुटी रस्ता, सांगली) ठार झाला. सिव्हिल हॉस्पिटलच्या पिछाडीस मराठा सेवा संघाच्या कार्यालयासमोर दुपारी दीड वाजता ही थरारक घटना घडली.
प्रतिस्पर्धी टोळीतील दहा ते पंधराजणांनी हल्ला चढविल्याने बाळू भोकरे व त्याच्या तीन साथीदारांनी गल्ली-बोळाचा आधार घेत पलायन केले. हल्लेखोरांनी त्यांच्या दोन दुचाकींची शस्त्राने मोडतोडही केली. इंदिरानगर, सावंत प्लॉट, शंभरफुटी रस्ता या परिसरात वर्चस्व किंवा सावकारी या कारणांवरून हा खून झाल्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने तपासाची चक्रे फिरविली जात आहेत, अशी माहिती जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी दिली. भरदिवसा टोळीयुद्धातून खून झाल्याचे समजताच पोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक राजन माने, विश्रामबागचे सहायक निरीक्षक अभिजित देशमुख व गुंडाविरोधी पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी मृत मकानदार व त्याच्या साथीदाराच्या दोन दुचाकी होत्या. मकानदार रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. डोक्यात, कानाजवळ धारदार शस्त्राने हल्ला केल्याने प्रचंड रक्तस्त्राव होऊन त्याचा मृत्यू झाला.
शकील मकानदार हा बाळू भोकरेचा विश्वासू साथीदार होता. गेल्या काही महिन्यांपासून त्याचा सावंत प्लॉट परिसरातील एका टोळीशी वर्चस्वातून वाद सुरू होता. या वादातून एकमेकांच्या साथीदारांना चिडवणे, मारहाण करणे, असे प्रकार सुरू होते. शुक्रवारी सकाळीही असाच प्रकार घडला. त्यामुळे बाळू भोकरे व मकानदार विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेले होते. पोलिसांनी तक्रारीची शहानिशा केली जाईल, असे सांगितले. त्यानंतर बाळू व मकानदार तेथून इंदिरानगर परिसरात आले. बाळूने आपल्याविरुद्ध तक्रार केल्याची कुणकुण प्रतिस्पर्धी टोळीला लागली. दुपारी दीड वाजता बाळू भोकरे, शकील मकानदार व अन्य दोघे असे एकूण चौघेजण दोन दुचाकीवरून मराठा सेवा संघाच्या कार्यालयापासून निघाले होते. त्यावेळी प्रतिस्पर्धी टोळीतील दहा ते पंधराजणांनी गाठून त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला.
सांगलीत टोळीयुद्धातून तरुणाचा खून
टोळीने भोकरेसह चौघांना लक्ष्य केले; पण बाळूसह तिघांनी तेथून पलायन केले. मकानदार त्यांच्या तावडीत सापडला. टोळीने धारदार शस्त्राने त्याच्या डोक्यात, कानाजवळ वार केले. त्यात तो जागीच ठार झाला. या घटनेवेळी रस्त्यावरील लोकांची पळापळ झाली. परिसरातील रहिवाशांनी दरवाजे बंद करुन घेतले. शकीलच्या भावाने घटनास्थळी आक्रोश सुरू केला. मृतदेह हलविण्यास विरोध केला. शासकीय रुग्णालयातही त्याने विच्छेदन तपासणी करण्यास विरोध केला. पोलिसांनी त्याची समजूत काढल्यानंतर तो शांत झाला.
बाळू भोकरे पोलिस ठाण्यात
बाळू भोकरे सायंकाळी विश्रामबाग पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. पोलिसांनी त्याची कसून चौकशी सुरू केली आहे. प्रतिस्पर्धी टोळीतील सदस्यांची नावे त्याने घेतली आहेत. परंतु पोलिस त्याने दिलेली माहिती तपासत आहेत. त्याची फिर्यादही घेतली जाणार आहे. रात्री उशिरापर्यंत फिर्याद नोंद नव्हती. त्यामुळे खून कोणी केला, त्यामागे काय कारण आहे, याचा तपशील मिळू शकला नाही.
नगरसेवकांचा ठिय्या
पोलिसांनी हल्ला करणाºया प्रतिस्पर्धी टोळीतील काही जणांना तसेच बाळू भोकरेला चौकशीसाठी पाचारण केले होते. पोलिस ठाण्यातील एका बंद खोलीत चौकशी सुरू होती. त्यावेळी राष्टÑवादीचे नगरसेवक राजू गवळी, शेडजी मोहिते, दिग्विजय सूर्यवंशी व बाळू व ऊर्फ महिंद्र सावत हेही सायंकाळी विश्रामबाग पोलिस ठाण्याबाहेर कट्ट्यावर ठिय्या मांडून बसले होते. बाळू भोकरे त्यांच्यापासून दूर बसला होता.
कोणाचीही गय नाही : शिंदे
जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे म्हणाले की, मकानदारच्या खुनाची घटना अत्यंत गंभीर आहे. दहा ते पंधराजणांनी हल्ला केल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. मुलीची छेड, टोळ्यांमधील वर्चस्ववाद, रागाने पाहणे व सावकारी ही कारणे खुनामागे असू शकतात. त्यादृष्टीने तपास सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात सातत्याने भांडणे सुरु होती, अशी माहिती मिळाली आहे. कोणाचीही गय केली जाणार नाही. ज्यांची नावे निष्पन्न होतील, त्यांना अटक केली जाईल. त्यांच्याविरुद्ध सबळ पुरावे गोळा करुन शिक्षेसाठी प्रयत्न केले जातील.