कामेरीत बाजारातील जागेच्या वादातून खुनीहल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:37 AM2020-12-30T04:37:18+5:302020-12-30T04:37:18+5:30
इस्लामपूर : कामेरी (ता. वाळवा) येथे बाजार करण्यासाठी बसण्याच्या जागेवरून झालेल्या वादात एकावर सुऱ्याने हल्ला करून खुनाचा प्रयत्न करण्यात ...
इस्लामपूर : कामेरी (ता. वाळवा) येथे बाजार करण्यासाठी बसण्याच्या जागेवरून झालेल्या वादात एकावर सुऱ्याने हल्ला करून खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली. हा प्रकार मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास कामेरी चौकात घडला. याबाबत जखमी गोरख हंबीरराव क्षीरसागर (वय ३५) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अफजल इनामदार व त्याची पत्नी यास्मीन इनामदार या दोघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
यातील जखमीस अधिक उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. क्षीरसागर यांची आई आणि मुलगी भाजीपाला व्यवसाय करतात. इनामदार कुटुंबाचाही हाच व्यवसाय आहे. कामेरी चौकात ग्रामपंचायतीने आखून दिलेल्या जागेत त्यांचा व्यवसाय सुरू असतो. दुपारी अफजल इनामदार याने क्षीरसागर यांच्या जागेवर व्यवसायासाठी तयारी केली होती. त्याना क्षीरसागर यांच्या मुलीने हरकत घेतल्याने इनामदार याने तिला शिवीगाळ केली. त्यानंतर सुरा घेऊन त्याने गोरख क्षीरसागर यांच्या कानावर, मानेवर आणि पाठीत वार करून त्यांना जखमी केले. जीव वाचविण्यासाठी क्षीरसागर पळून जात असताना पुन्हा इनामदार याने त्यांचा पाठलाग करत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान, यास्मिन इनामदार हिने क्षीरसागर यांच्या आईला मारहाण केली.