Sangli- बेडगला कालव्यात बुडालेल्या दोघांचे मृतदेह चौदा तासानंतर सापडले
By श्रीनिवास नागे | Published: April 5, 2023 06:07 PM2023-04-05T18:07:43+5:302023-04-05T18:08:06+5:30
कालव्यातील पाण्याच्या प्रवाहात शोध घेणे अडचणीचे होत असल्याने म्हैसाळ योजनेचे पंप बंद करण्यात आले होते
मिरज : बेडग-मंगसुळी रस्त्यावर म्हैसाळ सिंचन योजनेच्या कालव्यात पाय धुण्यासाठी गेल्यानंतर कालव्यात पडलेल्या दोघा तरुणांचे मृतदेह बुधवारी मध्यरात्री कालव्यात सापडले. मंगळवारी दुपारी तिघापैकी एका तरुणास वाचविण्यात यश आले. बाकीचे दोघे कालव्यात बुडाले.
सलमान शौकत तांबोळी (वय २०), अरमान हुसेन मुलाणी (२१), नदीम मुलाणी व कुलदीप मौर्य (रा. मंगळवार पेठ, माधवनगर) हे चौघेजण रंगकाम करतात. मंगळवारी एका इमारतीच्या पीओपीच्या कामासाठी ते बेडग-मंगसुळी रस्त्यावर गेले होते. उन्हामुळे हातपाय धूण्यासाठी चौघेजण म्हैसाळ कालव्यात उतरल्यानंतर सलमान व अरमान दोघे पाय घसरून म्हैसाळ कालव्यात पडले. पोहता येत नसल्याने दोघे कालव्यातील पाण्यात वाहून गेले.
मिरज ग्रामीण पोलीस व आयुष हेल्पलाईन पथकाने घटनास्थळी बुडालेल्या दोघा तरुणांचा शोध सुरू केला. म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरु असल्याने कालव्यातील पाण्याच्या प्रवाहात शोध घेणे अडचणीचे होत असल्याने म्हैसाळ योजनेचे पंप बंद करण्यात आले होते. अविनाश पवार, सूरज शेख, अमोल होटकर यांनी दिवसरात्र शोध घेतला. सुमारे चाैदा तासांच्या प्रयत्नानंतर पाण्यात बुडालेल्या ठिकाणापासून सुमारे ४०० मीटर अंतरावर दोघांचे मृतदेह सापडले. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात नोंद करण्यात आली आहे.