शरीरसौष्ठव स्पर्धेत म्युझिक पोजिंग पुन्हा सुरू करणार; सांगलीत चार जिल्ह्यांच्या बैठकीत निर्णय
By संतोष भिसे | Published: October 15, 2023 06:40 PM2023-10-15T18:40:03+5:302023-10-15T18:40:28+5:30
शरीरसौष्ठव स्पर्धेत अस्तंगत झालेल्या म्युझिक पोजींग (संगीताच्या ठेक्यावर पोझ देणे) पुन्हा सुरु करण्याचा निर्णय शरीरसौष्ठव संघटनेच्या बैठकीत झाला.
सांगली: शरीरसौष्ठव स्पर्धेत अस्तंगत झालेल्या म्युझिक पोजींग (संगीताच्या ठेक्यावर पोझ देणे) पुन्हा सुरु करण्याचा निर्णय शरीरसौष्ठव संघटनेच्या बैठकीत झाला. सांगलीसह सातारा, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यांतील संघटनांचे पदाधिकारी व शरीरसौष्ठवपटूंची बैठक रविवारी सांगलीत तरुण भारत व्यायाम मंडळात झाली. यावेळी स्पर्धेसाठी विविध नियम व निर्णय घेण्यात आले.
बैठकीला संघटनेचे पदाधिकारी संजय भोकरे, सागर काबरा, अमित डोळे, सुनील सावळवाडे, सागर घोडके आदी उपस्थित होते. फेब्रुवारीमध्ये सांगलीत तीन जिल्ह्यांची शरीरसौष्ठव स्पर्धा घेण्याचा निर्णय घोडके यांनी जाहीर केला. स्पर्धेतील वशिलेबाजी, बोगस प्रमाणपत्रे, नोकऱ्यांमधील संधी आदी विषयांवर बैठकीत चर्चा झाली. कोल्हापूरचे राजेश वडाम यांनी सांगितले की, चमचेगिरी करणाऱ्यांना प्रमाणपत्रे व नोकऱ्या मिळण्याने प्रामाणिक शरीरसौष्ठवपटूंची निराशा होते. शिवछत्रपती पुरस्कार मिळण्यातील वशिलेबाजीनेही नुकसान होते पण यावेळी खेळाडूंनी प्रस्ताव दाखल करावेत, आपण त्यांना पुरस्कारासाठी पाठपुरावा करू. कोल्हापुरात कनिष्ठ गटाची स्पर्धा घेण्याचा निर्णय वडाम यांनी जाहीर केला.
बैठकीला राजेंद्र हेंद्रे (सातारा), स्वामी हिरेमठ (सोलापूर), विवेक संकपाळ, मुरली वत्स, संदीप यादव, दीपक माने, सचिन कुलकर्णी, श्रीकांत माने, सागर घोडके, कैलास शिपेकर, विश्वनाथ बकाली, शेख अन्वर हुसेन, हर्ळ, खरे, शरणकुमार कुंभार हेदेखील उपस्थित होते.
शरीरसौष्ठवपटूंनी चमकोगिरी करू नये
स्पर्धेत पंचांचा निर्णय मान्य नसल्यास अनेक स्पर्धक सोशल मीडियावर विरोधात पोस्ट करतात. त्यामुळे स्पर्धेची, संयोजकांची आणि संघटनेची बदनामी होते. त्याऐवजी स्पर्धकांनी पंच किंवा संयोजकांकडे कायदेशीर दाद मागावी, निर्णयाला आव्हान द्यावे, अशी भूमिका बैठकीचे निमंत्रक इनायत तेरदाळकर यांनी मांडली.
महत्वाचे निर्णय
- - शरीरसौष्ठव स्पर्धा दुपारी पाच वाजता सुरू करणे
- - रात्री दहापूर्वी संपवणे, जेणेकरून स्पर्धक रात्रीचा प्रवास सुरक्षितरित्या करून घरी पोहोचतील.
- - कोणत्याही संघटनेच्या शरीरसौष्ठवपटूला अन्य कोणत्याही संघटनेतर्फे खेळण्याची मुभा
- - स्पर्धेसाठी उशिरा येणाऱ्या स्पर्धकास दंड, प्रसंगी स्पर्धेत सहभागास मनाई