सांगलीत जुन्या रेकॉर्डमध्ये सापडताहेत बोगस कुणबी नोंदी, मोडी लिपीमध्ये खाडाखोड
By संतोष भिसे | Published: November 25, 2023 01:35 PM2023-11-25T13:35:43+5:302023-11-25T13:36:21+5:30
कुणबी मान्य; कुळवाडी, कुह्रवाडीचे काय?
संतोष भिसे
सांगली : कुणबी नोंदी शोधण्याची मोहीम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. प्रशासन सव्वाशे वर्षांपासूनच्या नोंदी धुंडाळत आहे. यादरम्यान काही बोगस नोंदीही सापडत आहेत.
जिल्हा प्रशासन १८८० पासून १९६७ पर्यंतचे दप्तर तपासत आहे. साधारणत: १९२० पासून पुढे देवनागरीत, तर तत्पूर्वी मोडी लिपीमध्ये नोंदी आहेत. मोडी नोंदी पडताळण्यासाठी ‘कुणबी’ या शब्दाचा मोडी नमुना प्रशासनाने सर्व कार्यालयांना पाठविला आहे. त्यानुसार विविध कार्यालयांत कर्मचारी दप्तर तपासत आहेत. काही ठिकाणी मोडी जाणकारांचीही मदत घेतली आहे.
या तपासणीमध्ये मोडीतील बोगस नोंदी सापडत आहेत. १९६७ पूर्वीच्या दप्तरात नोंदी केल्या आहेत. तत्कालीन गावकुलकर्णी किंवा गावकारभाऱ्यांनी सराईत मोडीमध्ये नोंदी केल्या होत्या. पण, पुढे बनवेगिरी करताना बाळबोध पद्धतीने ‘कुणबी’ अशी नोंद केली आहे. काही ठिकाणी खाडाखोड केली आहे. काही ठिकाणी ‘मराठा’ समोर ‘कुणबी’ असा विस्तार लिहिला आहे. काही ठिकाणी नव्याने कोरी पाने जोडून नवी नावे घुसडली आहेत.
अशी केली बोगसगिरी
प्रत्येक रजिस्टरमध्ये नोंदी संपल्यानंतर शेवटी काही कोरी पाने शिल्लक असतात. ती फाडून मध्येच चिकटविली आहेत. त्यावर मोडीमध्ये बोगस नोंदी लिहिल्या आहेत. आपल्या नावापुढे कुणबी नोंद केली आहे. शंका येऊ नये म्हणून या पानांवर मध्येमध्ये अन्य जातीची, धर्माची नावेही नोंदविली आहेत. मोडीच्या जाणकारांना शोधमोहिमेदरम्यान ही बनवेगिरी लक्षात येत आहे. या बनावट कुणबींनी इतर मागास प्रवर्गातून सरकारी नोकऱ्या मिळविल्या आहेत. जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेतही या नोंदी पुरावा स्वरूपात सादर केल्या गेल्या आहेत.
कुणबी मान्य; कुळवाडी, कुह्रवाडीचे काय?
ब्रिटिश आणि संस्थानिक काळात कुणबीसाठी कुळवाडी तसेच कुह्रवाडी हा शब्दही प्रचलित होता. त्यामुळे काही ठिकाणी कुणबी, काही ठिकाणी कुळवाडी, तर काही ठिकाणी कुह्रवाडी अशा नोंदी आहेत. शासनाने कुणबी नोंदींना मान्यता दिली आहे. कुळवाडी आणि कुह्रवाडीचे काय? हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. नोंद असूनही कुळवाडी मराठे ओबीसी समावेशापासून वंचित राहणार आहेत.
इस्लामपूर, विटा, तासगाव अपडेट
इस्लामपूर, तासगाव, विटा, आष्टा नगरपालिकांमध्ये जुने रेकार्डही सुस्थितीत आहे. झीरो पेन्डन्सी मोहिमेतही ते सांभाळण्याची दक्षता प्रशासनाने घेतली. त्याचा फायदा आता कुणबी नोंदी शोधण्यामध्ये होत आहे.