सावधान!, सांगली जिल्ह्यात बोगस बियाण्यांची होतेय विक्री, कृषी विभागाची विक्रेत्यांवर नजर
By अशोक डोंबाळे | Published: May 12, 2023 06:17 PM2023-05-12T18:17:32+5:302023-05-12T18:45:36+5:30
जिल्ह्यात खरीप पेरणी पूर्व मशागतीसाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू
सांगली : जिल्ह्यात खरीप पेरणी पूर्व मशागतीसाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. मान्सूनचे वेळेत आगमन झाल्यास जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पेरण्या होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच काही बोगस बियाणे विक्रेत्यांचा सुळसुळाट सुरू आहे. त्यातून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. म्हणून शेतकऱ्यांनी अशा विक्रेत्यांकडून बियाणे खरेदीच करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. ३२ हजार ६१९ क्विंटल बियाणे आणि एक लाख ८९ हजार टन रासायनिक खतांची मागणी केली आहे.
जिल्ह्यात खरीप पेरणीचे दोन लाख १७ हजार ६९३ हेक्टर प्रस्ताविक क्षेत्र आहे. खरीप आणि रब्बी हंगामात दरवर्षी बोगस बियाणे विक्रेत्यांचा शिरकाव होतो. काहीजण विक्रेत्यांना अनधिकृतपणे कमी दरात बियाण्यांचा पुरवठा करून ते बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारले जात आहे. बियाणांची उगवण चांगली झाली नाही की शेतकऱ्यांच्या तक्रारी येतात.
पण, संबंधित विक्रेत्यांकडून बियाणे खरेदीची पावती न घेतल्यास कृषी विभाग त्या दुकानदारावर काहीच कारवाई करू शकत नाही. म्हणून शेतकऱ्यांनी बोगस बियाण्यातून सुटका करून घेण्यासाठी खत, कीटकनाशक आणि बियाणे खरेदी करताना पावती घेण्याची गरज आहे. तरच बोगसगिरी झाल्यास दुकानदार आणि कंपनीवर कारवाई करता येईल, असे आवाहनही कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
परवानाधारक दुकानांतूनच बियाणे घ्यावे : स्वप्नील माने
कमी दरात बियाणे देण्याच्या नावाखाली सोयाबीन, तूर, मका, बाजरी बियाणांची काही विक्रेत्यांकडून बोगसगिरी होण्याची शक्यता आहे. काही शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार बोगस बियाणे विक्रेते आणि एजंटांवर ही आमचे लक्ष आहे. परंतु, शेतकऱ्यांनी परवानाधारक कृषी सेवा केंद्र चालकांकडूनच बियाणे, कीटकनाशक आणि रासायनिक खताची खरेदी करण्याची गरज आहे. खरेदी बरोबर शेतकऱ्यांनी दुकानदारांकडून पावती घ्यावी, असे आवाहन जिल्हा मोहीम अधिकारी स्वप्नील माने यांनी केले आहे.
अशी आहे बियाणांची मागणी
पीक बियाणे (क्विंटल)
भात ५६९४
ज्वारी ३०००
बाजरी २०५०
तूर ५३७
मूग १७७
उडीद १०३७
भुईमूग १२५३
सूर्यफुल २२१
मका ७००४
सोयाबीन ११६६८
अशी आहेत रासायनिक खतांची मागणी
खत प्रकार मागणी (टनात)
युरिया ५२१००
डीएपी २०८९१
एमओपी २११७५
कॉम्पलेक्स ६४९०२
एसएसपी ३०२८६
एकूण १८९३५४