इस्लामपुरात साडेतेवीस लाखांचे सोयाबीनचे बोगस बियाणे जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 07:35 PM2022-06-02T19:35:44+5:302022-06-02T19:36:04+5:30

सांगली : इस्लामपुरातील उरुणवाडी (ता. वाळवा) येथे गरुड सीड्स कंपनीच्या नावाने बोगस सोयाबीन बियाणे निर्मिती होत असल्याचे उघडकीस आले. ...

Bogus soybean seeds worth Rs 23 lakh seized in Islampur | इस्लामपुरात साडेतेवीस लाखांचे सोयाबीनचे बोगस बियाणे जप्त

इस्लामपुरात साडेतेवीस लाखांचे सोयाबीनचे बोगस बियाणे जप्त

googlenewsNext

सांगली : इस्लामपुरातील उरुणवाडी (ता. वाळवा) येथे गरुड सीड्स कंपनीच्या नावाने बोगस सोयाबीन बियाणे निर्मिती होत असल्याचे उघडकीस आले. कृषी विभागाने मंगळवारी छापा टाकून २३ लाख ५३ हजार ५०० रुपयांचे बियाणे जप्त केले. याप्रकरणी कंपनीचा मालक प्रणव गोविंद हसबनीस याच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

उरुणवाडी येथे बोगस बियाणे तयार होत असल्याची तक्रार कृषी अधिकारी संजय बुवा यांच्याकडे आली होती. त्यानुसार जिल्हा गुण नियंत्रक निरीक्षक सुरेंद्र पाटील, स्वप्नील माने, तालुका कृषी अधिकारी भगवान माने, बंडा कुंभार यांच्या पथकाने मंगळवारी दुपारी तीन वाजता उरुणवाडी येथे छापा टाकला. यावेळी महिला मजुरांमार्फत सोयाबीन निवडण्याचे काम सुरू होते. गोदामाच्या आतील बाजूस बियाणे प्रक्रियेचे यंत्र होते. तेथे छापील पिशवीमध्ये बियाणे भरण्याचे काम सुुरू होते. प्रत्येक पिशवी २५ किलोची होती. त्यावर सोयाबीनचा वाण : केडीएस ७२६, लॉट क्रमांक : ऑक्टोबर २०२१, बॅग भरण्याची तारीख : दि. २४ फेब्रुवारी २०२२ असे लिहिले आहे. २५ किलोच्या पिशवीसाठी ४५०० रुपये दर आहे. उत्पादक व विक्रेता गरुड सीडस असल्याचे पिशवीवर छापले आहे. संबंधित बियाणे तयार करणाऱ्या कंपनीचा मालक प्रणव हसबनीस याच्याकडे अधिकाऱ्यांनी परवान्याची मागणी केली. यावेळी त्याने परवाना दाखविला. त्यामध्ये बियाणे तयार करण्याचा उल्लेख नाही.

केवळ विक्रीचा परवाना असून त्यावर अंकुर सीड्स (नागपूर) या एकमेव कंपनीचा उल्लेख आहे. गरुड सीड्सने निर्मिती, साठवणूक व विक्री याबाबतचा परवाना घेतला नसल्याचे पथकाला दिसून आले. तेथील शेजारच्या चार खोल्यांची तपासणी केली. यावेळी केडीएस ७४३ जातीचे २३१ पिशव्यांमध्ये ५७७४ किलो, केडीएस ७२६ जातीचे १९२ पिशव्यांमध्ये ४८०० किलो बियाणे सापडले. याचे बाजारमूल्य २३ लाख ५३ हजार ५०० रुपये आहे. हा साठा शंकास्पद असल्याने नमुने घेतले आहेत. सर्व बियाणे सील करून विक्री बंदचे आदेश दिले आहेत. गैरकारभाराबद्दल प्रणव हसबनीसवर गुन्हा दाखल केला आहे.

परवाना एकाची, विक्री दुसऱ्याचीच

प्रणव हसबनीसने अंकुर सीड्सच्या बियाणे विक्रीसाठी कृषी विभागाकडून परवाना घेतला आहे. पण, प्रत्यक्षात परवाना घेतलेल्या कंपनीचे बियाणे तिथे सापडलेच नाही. गरुड सीड्स या नावाने छुप्या पद्धतीने बियाणे तयार केले जात होते.

Web Title: Bogus soybean seeds worth Rs 23 lakh seized in Islampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली