हुतात्मा कारखान्याचा बॉयलर अग्नीप्रदीपन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 03:56 PM2017-10-02T15:56:58+5:302017-10-02T16:02:04+5:30
क्रांतीवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर साखर कारखान्याच्या ३५ व्या हंगामाचे बॉयलर अग्नीप्रदीपन सोमवारी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून करण्यात आले.
वाळवा : केंद्र सरकारने आठ लाख टन साखर आयात केली नसती, तसेच कारखान्यांवर साखर साठ्याबाबत बंधने लादली नसती, तर ‘हुतात्मा’ला आणखी दर देणे शक्य झाले असते. साखर उद्योगावरील आयकरही जादा दरासाठी अडचणीचा ठरत आहे, असे प्रतिपादन हुतात्मा कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी केले.
क्रांतीवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर साखर कारखान्याच्या ३५ व्या हंगामाचे बॉयलर अग्नीप्रदीपन सोमवारी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून करण्यात आले. यावेळी आयोजित जाहीर सभेत नायकवडी बोलत होते.
यावेळी कुसुमताई नायकवडी, वंदना माने, विशाखा कदम, महादेव कांबळे, महमद चाऊस, किरण नायकवडी, नंदिनी नायकवडी, वीरधवल नायकवडी, प्रभारी कार्यकारी संचालक दीपक पाटील, शिवाजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
नायकवडी म्हणाले, क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी घालून दिलेल्या आदर्शाप्रमाणे कारखान्याची वाटचाल सुरू आहे. कारखान्याच्या प्रथेप्रमाणे आज महात्मा गांधी जयंतीदिनी सुर्योदयाला कारखान्याचे बॉयलर अग्नीप्रदीपन करण्यात आले आहे. शासनाच्या आदेशाप्रमाणे १ नोव्हेंबरपासून गळीत हंगाम सुरू करण्यात येईल.
प्रा. बाळासाहेब नायकवडी म्हणाले, वैभव नायकवडी हे भविष्याचे वेध घेणारे अत्यंत वैचारीक व वैज्ञानिक कसोटीवरील चिकित्सक नेतृत्व आहे. हुतात्माच्या माध्यमातून इथेनॉल प्रकल्प उभारून तो कार्यान्वित करण्यापूर्वीच कर्जमुक्त करणे, हे केवळ वैभव नायकवडी यांच्या दूरदृष्टीमुळेच शक्य झाले आहे.
कामगारांकडून एक कोटीची गाडी
यावेळी हुतात्मा साखर कामगारांतर्फे वैभव नायकवडी यांना एक कोटी रूपये किमतीची आलिशान मोटार भेट देण्यात आली. कुसुमताई नायकवडी यांनी गाडीच्या चाव्या वैभव नायकवडींकडे सोपविल्या. यावेळी कुसुमताई म्हणाल्या, गरीब, कष्टकरी दैवत मानून हुतात्मा कारखाना उभा केला आहे. ऊस उत्पादकांना योग्य दर, कामगारांना वेतन व बोनस नियमितपणे देऊन त्यांचा आर्थिक स्तर उंचावला.
त्यांना विश्वास दिला. या विश्वासाचे प्रतिक म्हणून कामगरांनी वैभवला गाडी प्रदान केली आहे. यापुढेही हा विश्वास कायम राहावा. ‘टीम वर्क’च्या माध्यमातून कारखान्याच्या, पर्यायाने शेतकरी, कष्टकºयांच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे