‘बोल’ जयंत पाटील यांचे, ‘हल्ला’ सदाभाऊंवर,इस्लामपुरात आज राष्ट्रवादीचे शक्तिप्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 12:53 AM2018-04-05T00:53:21+5:302018-04-05T00:53:21+5:30
इस्लामपूर : राजारामबापू पाटील यांच्या पश्चात राजकारणात आलेल्या जयंत पाटील यांनी वाळवा तालुक्याच्या राजकीय इतिहासात कधीच हार मानली नाही. राजकीय बाह्यशक्तीपुढेही ते नमले
अशोक पाटील ।
इस्लामपूर : राजारामबापू पाटील यांच्या पश्चात राजकारणात आलेल्या जयंत पाटील यांनी वाळवा तालुक्याच्या राजकीय इतिहासात कधीच हार मानली नाही. राजकीय बाह्यशक्तीपुढेही ते नमले नाहीत. अगदी मोदी लटेतही ते तरले. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत बसून सोडलेले सदाभाऊ अस्त्र राष्ट्रवादीला धक्के देऊ लागले आहे. त्यामुळे आज होणाऱ्या हल्लाबोल यात्रेच्या सभेत कृषिराज्य मंत्री सदाभाऊ खोत हेच ‘टार्गेट’ राहणार आहेत.
राजकारणात प्रवेश केल्यानंतर आमदार जयंत पाटील यांनी मागे वळून कधी पाहिलेच नाही. आघाडी सरकारमध्ये महत्त्वाची खाती त्यांनी सक्षमपणे सांभाळली. मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत त्यांचे नाव होते. इस्लामपूर मतदारसंघात वसंतदादा घराण्यातील नेते आणि पतंगराव कदम यांनी जयंतविरोधी नेतृत्वाला खतपाणी घातले; परंतु ते वाया गेले.
गत लोकसभा निवडणुकीत खासदार राजू शेट्टी-सदाभाऊ खोत यांनी महाआघाडीत सामील होऊन जयंत पाटील यांना अडचणीत आणले होते. मोदी लाटेचा फायदा शेट्टी यांना झाला. विधानसभेला मात्र जयंतविरोधी नेत्यांमध्ये बिघाडी झाली. कॉँग्रेस, शिवसेनेचा सवतासुभा, बळीराजाचे बी. जी. पाटील यांची वेगळी भूमिका पाटील यांच्या पथ्यावर पडली. राज्यात कॉँग्रेस-राष्ट्रवादीतील मातब्बरांना धक्के बसले. शिराळ्यात राष्टÑवादीच्या मानसिंगराव नाईक यांचा पराभव झाला. पाटील यांना विधानसभेत विरोधी गटनेते पदावर समाधान मानावे लागले.
सदाभाऊंना मंत्रीपद मिळाल्यापासून त्यांनी राष्ट्रवादीला धक्कातंत्र देण्यास सुरुवात केली आहेत. नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे निशिकांत पाटील यांना भाजपमध्ये घेऊन त्यांनी पहिला धक्का दिला. शिवाय ३१ वर्षांची सत्ता उलथवण्याची कामगिरीही पार पाडली. त्यावेळी केवळ जयंत पाटील यांनाच टार्गेट केले गेले. याचा वचपा काढण्यासाठी जयंत पाटीलही सरसावले आहेत. गुरुवारी इस्लामपूर येथील खुल्या नाट्यगृहात जाहीर सभा होणार आहे. या सभेत भाजपबरोबरच सदाभाऊ खोत यांनाच टार्गेट केले जाणार आहे.
कोणाचाच असर नाही!
वाळवा-शिराळ्यात आमदार जयंत पाटील आणि भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांचे कधीही सख्य जमले नाही. युती सरकारच्या काळात अण्णासाहेब डांगे, शिवाजीराव नाईक मंत्री होते. मात्र त्यांचीही मात्रा जयंत पाटील यांच्यावर लागू झाली नाही. उलट नंतर डांगे यांनी पाटील यांच्यासोबत येऊन राष्ट्रवादीला बळ दिले.