‘बोलक्या बाहुल्यांसंगे’ बालचमू हरखले..
By admin | Published: October 10, 2014 11:28 PM2014-10-10T23:28:09+5:302014-10-10T23:36:31+5:30
लोकमत’ बाल विकास मंचच्यावतीने आयोजित
सांगली : ‘लोकमत’ बाल विकास मंचच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘हसूया बाहुल्यांसंगे’ या कार्यक्रमाला बालचमूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे सादरकर्ते सत्यजित पाध्ये यांनी बाहुल्यांसोबत वेगवेगळे आवाज काढून मुलांची करमणूक केली. मार्केट यार्ड येथील वसंतदादा स्मृती भवन येथे हा कार्यक्रम पार पडला. यावर्षीच्या ‘लोकमत’ बालविकास मंचच्या सदस्यांसाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सत्यजित पाध्ये यांनी सर्वप्रथम काळ्या - पांढऱ्या ठिपक्यांचा कुत्रा (बाहुला ) मुलांसमोर आणला. त्याचे नाव डॉट. कॉम. डॉगी होते. यानंतर त्यांनी आपल्या अनोख्या विनोदी शैलीतून एकापेक्षा एक सरस विनोद सादर करताच बालप्रेक्षकांतून हास्याचे कारंजे उडू लागले. गोल चेहऱ्याच्या रंगीलाने कार्यक्रमात रंगत आणली.
या कलेबद्दल पाध्ये म्हणाले की, वयाच्या सातव्या वर्षापासून ही कला मी शिकत होतो. चौदाव्या वर्षी स्टेजवर पहिला कार्यक्रम केला. बाहुल्यांचा आवाज पोटातून काढावा लागतो. म्हणजे बोलताना ओठ हलत नाहीत व आवाजातही वेगळेपणा येतो. पाध्ये यांनी बोलणारे बाहुले कसे तयार होतात, याचे प्रात्यक्षिकही मुलांना दाखविले. सत्यजित पाध्ये यांच्याहस्ते दीपप्रज्ज्वलन व उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या मध्यंतरात वैष्णवी जाधव, वर्षा जाधव यांनी नृत्याचे सादरीकरण करून उपस्थितांची वाहवा मिळविली. (प्रतिनिधी)