जुगार, मटका खेळणाऱ्यांपेक्षा बुकी झाले बेफाम

By admin | Published: October 9, 2015 11:07 PM2015-10-09T23:07:23+5:302015-10-09T23:07:23+5:30

अवैध व्यवसाय जोमात : वाळवा-शिराळ्यातील पोलिसांचे नियंत्रण सुटले; टोळीयुद्धाची शक्यता वाढली

Booker than Gambling, Players | जुगार, मटका खेळणाऱ्यांपेक्षा बुकी झाले बेफाम

जुगार, मटका खेळणाऱ्यांपेक्षा बुकी झाले बेफाम

Next

अशोक पाटील - इस्लामपूर--आघाडी शासनाच्या काळात तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आपल्या जिल्ह्यातील जुगार, मटका, बेकायदेशीर व्हिडीओ गेम अशा अनधिकृत व्यवसायांना हद्दपार केले होते. आता भाजप सरकारच्या काळात हे सर्व व्यवसाय चांगलेच बाळसे धरू लागले आहेत. शहरांसह ग्रामीण भागातही मटक्याला ऊत आला आहे. याचे बुकी असलेल्यांना राजकीय वरदहस्त लाभल्याने ते चांगलेच बेफाम झाले आहेत. या व्यवसायात मोठी स्पर्धा असून याकडे पोलिसांचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे भविष्यात अशा व्यवसायातून टोळीयुध्द भडकण्याची शक्यता आहे.
कृष्णा—वारणा खोऱ्यात वसलेल्या वाळवा, शिराळा तालुक्यात मोठी सुबत्ता आहे. जमिनीचे दर तर गगनाला भिडले आहेत. काम करण्यासाठी मजुरांचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे. त्यामुळे मजुरीचे दरही चांगलेच वधारल्यामुळे कामगारच मालकापेक्षा शिरजोर झाला आहे.
दिवसभराची मिळालेली मजुरी दारू, मटका व जुगारावर उधळली जात आहे. या व्यवसायाकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. म्हणूनच मटका खेळणाऱ्यांपेक्षा मटका घेणाऱ्या टपऱ्यांची व बुकींची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. अशा बुकींना राजकीय वरदहस्त असल्याने ते चांगलेच बेफाम झाले असल्याच्या नागरिकांतून तक्रारी आहेत.
आघाडी शासनाच्या काळात पोलिसांना विनाअडचण काम करता यावे यासाठी अत्याधुनिक यंत्रणेसह पोलीस ठाण्याच्या मोठ्या इमारती उभ्या केल्या आहेत. आघाडी शासनाच्या काळात बंद झालेले अनधिकृत व्यवसाय आता भाजपच्या काळात पुन्हा सुरु झाले आहेत. भाजप सरकार हे बुध्दिवाद्यांचे सरकार मानले जाते. पण आघाडी शासनातील नेत्यांचेच कार्यकर्ते अशा व्यवसायात असल्याचे चित्र आहे. शिवसेनेचे कार्यकर्तेही अशा व्यवसायात गुंतलेले आहेत. त्यामुळे शासनानेच अशा व्यवसायाला अभय दिले आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
एकंदरीत बंद पडलेले अनधिकृत व्यवसाय पुन्हा जोमाने सुरु झाले आहेत. तसेच शहरात बेकायदेशीर व्हिडीओ गेम्स सुरू असून याकडे युवा वर्ग आकर्षित झाला आहे. शासनही अशा व्यवसायास कायदेशीर परवानगी देत आहे. एकंदरीत झटपट लॉटरीबरोबरच मटका, जुगार आणि व्हिडीओ पार्लरवाल्यांचा सुळसुळाट झाला असून, पोलिसांना हप्ते सुरु असल्याने त्यांनीही याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.



गुन्हेगारी वाढणार
मटका व जुगारीचे व्यवसाय शिराळा, इस्लामपूर शहरासह परिसरातील गावांमध्ये वाढले आहेत. या व्यवसायाकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्यास भविष्यात गुन्हेगारी वाढण्याची शक्यता नागरिकांतून व्यक्त होत आहे. म्हणूनच पोलिसांनी दोन नंबरचे उद्योग करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याची गरज असल्याच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत.

Web Title: Booker than Gambling, Players

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.