Sangli News: मिरजेत आयपीएल क्रिकेट बेटिंगसाठी बुकी सरसावले, ऑनलाईन ॲपद्धारे सट्टा
By श्रीनिवास नागे | Published: March 28, 2023 05:06 PM2023-03-28T17:06:26+5:302023-03-28T17:07:01+5:30
महाराष्ट्रातून कोट्यवधीची उलाढाल
सांगली : आयपीएल क्रिकेट बेटिंगवर सट्टेबाजारासाठी मिरजेतील बेटिंग बुकी सरसावले आहेत. बुकींसाठी पर्वणी असलेली आयपीएल क्रिकेट स्पर्धा सुरू होत असल्याने मिरजेतून ऑनलाईन बेटिंग ॲप कार्यान्वित झाले आहेत.
दरवर्षी आयपीएल क्रिकेटवर बेटिंगमध्ये कोट्यवधींची उलाढाल होते. बेटिंगच्या जुन्या पद्धतीऐवजी बुकींनी ऑनलाईन बेटिंग ॲप आणले आहे. ट्रिपल नाईन डॉट कॉम व एक्स बुक अशा वेगवेगळ्या नावाने मिरजेतील बुकींनी बेटिंग ॲप सुरू केले आहे. या ॲपवर प्रत्येक सामन्यात प्रत्येक बाॅल, प्रत्येक ओव्हरला होणाऱ्या धावा, गोलंदाजाचे एकूण बळी, सामन्यात होणाऱ्या धावा, कोणता संघ जिंकणार, यावर बेटिंग लावण्यात येते. या बेटिंग ॲपमधून पश्चिम महाराष्ट्रातून कोट्यवधीची उलाढाल होण्याचा अंदाज असून यासाठी बुकींची लगबग सुरू आहे.
सट्टा लावणाऱ्या ग्राहकांसाठी नेमलेल्या एजंटांकडे रक्कम जमा करून आयडी व पासवर्ड घेऊन ऑनलाईन बेटिंग लावता येते. मिरजेत एका हॉटेलवरून ॲपचे कामकाज चालते. मिरजेतील आफताब, अमित, रमजान, सादिक नामक बुकींचे बेटिंग ॲप सुरू आहे. यातील काही बुकींनी आखाती देशात तळ ठोकून तेथून ऑनलाईन बेटिंगची तयारी केली आहे. मिरजेत एका महिन्यापूर्वी झालेल्या बॅंक ग्राहकांच्या फसवणुकीतील मोठी रक्कम क्रिकेट बेटिंगवर उधळल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी काही बेटींग बुकी पोलिसांच्या रडारवर आहेत.
कर्नाटक पाेलिसांचे मिरजेत छापे
आयपीएल सट्टाबाजारात मिरजेसह कर्नाटक सीमाभागातून कोट्यवधीची उलाढाल होते. गतवर्षी बेळगाव जिल्ह्यात आयपीएल बेटिंगचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यात मिरजेतील काही बुकींची नावे निष्पन्न झाली हाेती. कर्नाटक पोलिसांनी मिरजेत छापा टाकून बुकीला ताब्यात घेतले. मात्र स्थानिक पोलिसांचे या बुकींकडे दुर्लक्ष आहे.