शंभरावर वाळू तस्करांच्या ‘सातबारा’वर बोजा नोंद
By admin | Published: June 17, 2015 11:26 PM2015-06-17T23:26:12+5:302015-06-18T00:38:00+5:30
तासगाव तहसीलदारांची कारवाई : ३.७० कोटींचा दंड
तासगाव : तासगाव तालुक्यात बेकायदा वाळू उपसा आणि तस्करी केल्याप्रकरणी सध्याच्या आणि तत्कालीन तहसीलदारांनी १११ जणांवर दंडात्मक कारवाई केली होती. दंड न भरल्यामुळे संबंधितांच्या सात बारावर ३ कोटी ७० लाख १५ हजार रुपयांचा बोजा नोंद करण्यात आला आहे. तालुक्यातील वाळू तस्करी बंद करण्यासाठी तहसीलदार सुधाकर भोसले यांनी जागता पहारा ठेवला असून, बुधवारी बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या तिघांना २ लाख २६ हजार रुपये दंड ठोठावला आहे.
तहसीलदार सुधाकर भोसले यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर नायब तहसीलदार, अव्वल कारकुन, मंडल अधिकारी, लिपिक, तलाठी यांची पथके तयार केली आहेत. या पथकांच्या माध्यमातून तालुक्यात दिवसा आणि रात्रीही पहारा सुरूआहे. तालुक्यातील बेकायदा वाळू उपसा शंभर टक्के बंद करण्यासाठी महसूल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आठ दिवसांपूर्वी सातजणांची वाळू तस्करी पकडून त्यांना ६७ लाख ८७ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. त्यापैकी धनाजी चव्हाण यांनी ४४ हजार ८०० रुपये दंडाची रक्कम भरली. उर्वरित सहाजणांनी दंड न भरल्यामुळे त्यांच्या सातबारावर दंडाच्या रकमेइतका बोजा नोंद करण्याचे आदेश संबंधित तलाठ्यांना देण्यात आले आहेत.
दोन वर्षापूर्वी तत्कालीन तहसीलदारांनी केलेल्या कारवाईत ६७ जणांना २ कोटी ३२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. याविरोधात प्रांताधिकाऱ्यांकडे संबंधितांनी अपील केले होते. त्याठिकाणीही कारवाईचा निर्णय कायम राहिला. त्यामुळे ६७ जणांसह आतापर्यंत तासगाव तालुक्यातील १११ जणांच्या सातबारावर ३ कोटी ७० लाख रुपयांच्या दंडाची रक्कम बोजा स्वरुपात नोंद करण्यात आली आहे.
बुधवारी तहसीलदार भोसले यांनी केलेल्या कारवाईत श्रीकांत बुर्ले (तुरची) यांना ८८ हजार २००, धनाजी मुडदे (लांडगेवाडी) यांना ८८ हजार २००, तर अरविंंद शिंंदे (आरवडे) यांना ५० हजार ४०० रुपये दंड भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दंड न भरल्यास कायदेशीर कारवाई करुन सातबारावर बोजा नोंद करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. बेकायदा वाळूचा उपसा केल्याप्रकरणी सातबारावर बोजा नोंद केल्यामुळे तासगाव तालुक्यातील वाळू तस्करांच्यात खळबळ उडाली आहे. (वार्ताहर)