मोराळेतील भोंदूबाबाचा अंनिसकडून पर्दाफाश -दहा वर्षांपासून भोंदूगिरी; पोलिसांच्या ताब्यात; दर गुरुवारी भक्तांचा मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 11:53 PM2017-11-30T23:53:05+5:302017-11-30T23:54:45+5:30
मांजर्डे : मोराळे (ता. तासगाव) मधील भोंदूबाबा भालचंद्र पाटील याचा अंनिस व तासगाव पोलिसांनी पर्दाफाश केला.
मांजर्डे : मोराळे (ता. तासगाव) मधील भोंदूबाबा भालचंद्र पाटील याचा अंनिस व तासगाव पोलिसांनी पर्दाफाश केला. भालचंद्र पाटील याचा मोराळे गावात गेल्या दहा वर्षांपासून भोंदूगिरीचा कारनामा सुरू होता. पोलिसांनी केलेल्या कारवाईत या भोंदूबाबाला घटनास्थळावरच ताब्यात घेतले.
भालचंद्र पाटील (मूळ गाव मोराळे, पेड) याचा मागील दहा वर्षांपासून जादूटोणा करणे, अंगातील भूत काढणे, शारीरिक व्याधी दोन मिनिटामध्ये घालविणे, असा भोंदूगिरीचा उद्योग सुरू होता. याचा प्रचार महाराष्ट्राबाहेरील अनेक राज्यांत झाला आहे. दररोज येथे अनेक भक्त भेट देतात.
दर गुरुवारी येथे भक्तांचा मेळावा असतो. याबाबतची नोंद ठेवण्यासाठी येथे रजिस्टरही उपलब्ध आहे. हा भोंदूबाबा, ‘मला दत्त महाराजांची आज्ञा येते. प्रत्यक्षात देवही माझ्याशी बोलतो. त्यानुसार मी पुढील कार्य करतो’ असे सांगून तो भक्तांवर उपचार करतो. यावेळी उपचारादरम्यान अनेक भक्तांच्या अंगात येते. यामध्ये अज्ञानी भक्तांबरोबर उच्चशिक्षित भक्तांचाही समावेश आहे. येथे भक्तांवर मोफत उपचार केला जातो, मात्र या ठिकाणी पैसे गोळा करण्यासाठी पावती व अन्नदान पेटी ठेवली आहे.
भक्त स्वखुशीने या ठिकाणी आपला खिसा रिकामा करतात. मागील दहा वर्षांपासून त्याच्या या उद्योगाला भक्त बळी पडले आहेत. त्याच्यावर मागील काही दिवसांपासून अंनिस लक्ष ठेवून होती. याबाबत पोलिस महानिरीक्षक विश्वास नागरे-पाटील यांच्याकडेही अंनिसने तक्रार केली होती. शेवटी त्याच्यावर गुरुवारी कारवाई करण्यात आली.
प्रत्येकवर्षी या ठिकाणी दत्त जयंतीला मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यासाठी किमान दहा हजार भक्त उपस्थित राहतात. याची माहिती मिळताच जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत तासगाव पोलिसांनी या भोंदूबाबाला ताब्यात घेतले. हे सर्व भगवंताच्या कृपेने चालले आहे, पोलिस मला फाशी देत नाहीत. सर्वांनी शांत राहा, असे आवाहन त्याने भक्तांना केले. तासगावच्या पोलिस निरीक्षक प्रियांका सराटे, हवालदार वनवे, ए. एस. थोरवडे, पोलिस नाईक माने, पी. एन भोळे यांच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली. यावेळी अंनिसचे डॉ. विवेक गुरव, शरद शेळके उपस्थित होते.
पोलीसच लाभार्थी...
या भोंदूबाबाचे दर्शन घेण्यासाठी अडाणी व उच्चशिक्षित भक्तही दररोज उपस्थित होतात. यामध्ये चक्क विटा येथील सोमनाथ पाटील या पोलिसाचा व त्याच्या पत्नीचा समावेश असल्याचे पाहून उपस्थित थक्क झाले. यावेळी चक्क हा भोंदूबाबाच म्हणाला, पोलिससुद्धा भक्त आहेत. त्यामुळे यावेळी या बाबाचा पोलीस लाभार्थी दिसला.